सभांना दांडी मारणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई, आयुक्तांचा आदेश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 31, 2018 01:45 AM2018-08-31T01:45:00+5:302018-08-31T01:45:32+5:30
आयुक्त सौरभ राव : सर्व खातेप्रमुखांना काढले आदेश
पुणे : अधिकारी अनेक महत्त्वाच्या सभांना, बैठकींना उपस्थित राहत नाहीत, नगरसेवकांच्या लेखी पत्रांना उत्तरे देत नाहीत असे अनेक आरोप झाल्यानंतर महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी सभांना दांडी मारणाºया अधिकाºयांवर आता कारवाईचा बडगा उगारला आहे. यासाठी सर्व खातेप्रमुखांना लेखी आदेश देण्यात आले आहेत. सभेचे कामकाज अर्धवट सोडून जाताना महापौर व आयुक्तांची परवानगी घेणे बंधनकारक केले आहे.
महापालिकेच्या नुकत्याच झालेल्या सर्वसाधारण सभेत अधिकाºयांच्या अनुपस्थितीवरून आयुक्तांना महापौरासह सर्व पदाधिकारी आणि नगरसेवकांच्या रोषाला सामोरे जावे लागले होते. त्यानंतर आयुक्तांनी यापुढे सर्व अधिकारी सभांना उपस्थित राहतील, असे आश्वासन दिले होते. त्यानुसार राव यांनी सर्व खातेप्रमुखांना मुख्य सभेला उपस्थित राहणे बंधनकारक केले आहे. या आदेशांचे पालन न करणाºया अथवा त्यात हलगर्जीपणा करणाºया अधिकाºयांवर महापालिका अधिनियम कलम ५६ (२) नुसार कारवाई करण्यात येईल, असे स्पष्ट आदेश बजावले आहेत.
सूचना बंधनकारक
ज्या अधिकाºयांना काही अपरिहार्य कारणास्तव बैठकीस उपस्थित राहणे शक्य होणार नाही, त्यांच्या सहायक अधिकाºयांनी विषयाशी निगडित माहितीसह उपस्थित राहणे बंधनकारक केले आहे. तर, सभेच्या कामकाजाच्या वेळी काही कामानिमित्त बाहेर जावे लागत असेल, तर संबधित खातेप्रमुखाने महापौर आणि महापालिका आयुक्त यांना सूचना देऊन त्यांच्या परवानगीने सभागृह सोडावे, असेही आयुक्तांनी स्पष्ट केले आहे.