बीआरटीतील इतर वाहनांवर कारवाई करावी, प्रशासनाने खासगी वाहनचालकांना दंड ठोठावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 28, 2017 01:20 AM2017-10-28T01:20:52+5:302017-10-28T01:21:04+5:30
किवळे-सांगवी बीआरटी मार्गावरील रावेत ते किवळे दरम्यान बीआरटी लेनमधून वारंवार खासगी वाहने ये-जा करीत असून, त्यामुळे छेद रस्त्याच्या ठिकाणी अपघात होत आहेत.
किवळे : किवळे-सांगवी बीआरटी मार्गावरील रावेत ते किवळे दरम्यान बीआरटी लेनमधून वारंवार खासगी वाहने ये-जा करीत असून, त्यामुळे छेद रस्त्याच्या ठिकाणी अपघात होत आहेत. बीआरटी मार्गाकडून रावेत येथील सर्वांत मोठ्या ‘सेलेस्टियल सिटी सोसायटी’ या गृहप्रकल्पाकडे ये-जा करणे खूपच धोकादायक ठरत असल्याने संबंधितांना निवेदने देऊनही कार्यवाही होत नसल्याने रस्ता ओलांडणे असुरक्षित बनल्याने येथील महिलांनी प्राजक्ता रुद्रवार यांच्या नेतृत्वाखाली गेल्या आंदोलन करुन वाहने रोखली होती. तसेच रुद्रवार व स्थानिक नगरसेविका संगीता भोंडवे यांनी पीएमपीचे अध्यक्ष तुकाराम मुंढे यांची भेट घेत त्यानंतर मुकाई चौक व सेलेस्टाईल चौक येथे वाहतूक वॉर्डनमार्फत बसव्यतिरिक्त इतर वाहनांना बीआरटी लेनमधून जाण्यास मज्जाव करण्यात आलेला आहे. बीआरटीमधून इतर वाहनांना प्रवेश देऊ नये, यासाठी प्रशासनाने संबंधितांना दंड करावा, अशी मागणी महिलांनी ‘लोकमत’च्या परिसंवादात व्यक्त केली.
रावेत येथील सेलेस्टाईल सोसायटी चौक भागात बीआरटीएसच्या दुतर्फा राहणाºया नागरिकांना बीआरटी रस्ता ओलांडणे असुरक्षित बनले होते. गेल्या काही दिवसांत या भागात होणाºया अपघातांचे प्रमाण वाढत चालले आहे. बस व्यतिरिक्त इतर सर्व वाहनांना जाण्यास मज्जाव करण्यात आल्याने, तसेच जनजागृती करण्यात आल्याने अपघात कमी झाले आहेत. - प्राजक्ता रुद्रवार
वाहने रोखून आंदोलन करणे हा कायमस्वरूपी तोडगा नाही. मात्र वाहनचालकांत जागृती घडवून आणण्यासाठी प्रयत्न करण्यात आला आहे.
- सुस्वागता रॉय चौधरी
बीआरटी मार्गावर रावेत-किवळे भागात विविध ठिकाणी लोखंडी अडथळे, बॅरिकेड्स लावून खासगी वाहने रोखण्यासाठी उपाय योजणे शक्य आहे. तसेच रावेत पुलाजवळ (बास्केट पूल) वाहतूककोंडी सोडविण्यासाठी तातडीने उपाययोजना गरजेची आहे. - रश्मी त्यागी
आंदोलनादरम्यान बीआरटी लेनमधून पीएमपीशिवाय स्कूल बस, मोटारी ये-जा करीत असल्याचे आढळून आले. त्यामुळे अपघात होत असल्याने महिलांनी आंदोलन करून लेनमधून ये-जा करणाºया वाहनचालकांना परावृत्त करण्याचा प्रयत्न केला असून, संबंधित यंत्रणेनेही जबाबदारी स्वीकारून सुरक्षेसाठी व कायदा-सुव्यवस्था राखण्यासाठी हा विषय गांभीर्याने हाताळणे गरजेचे आहे. - केतकी नायडू
रावेतच्या या भागात सर्वाधिक अपघात होण्यास वाहनांची घुसखोरी जबाबदार असून, खासगी वाहनांवर कारवाई केल्यास भरधाव वेगात लेनमधून जाणारी वाहने जाणार नाहीत. परिणामी सोसायटीच्या भागात राहणाºया नागरिकांना सुरक्षित ये-जा करणे शक्य होईल.
- नझला मालाही
रावेत येथील सेलेस्टाईल सिटी सोसायटी चौकात सुरक्षित वाहतुकीसाठी कायमस्वरूपी वाहतूक पोलिसांची नेमणूक करावी. तसेच बीआरटी लेनमधून जाणाºया वाहनांवर दंडात्मक कारवाई केल्यास शिस्त लागू शकते. चौकाजवळ गतिरोधक असावेत जेणेकरून वेगावर नियंत्रण ठेवणे शक्य होईल.
- रिंकू बनाफल
बीआरटीमधून नागरिक व वाहनचालक रस्ता ओलांडण्यासाठी सुरक्षित ठिकाणाचा शोध घेत आहेत. सेलेस्टाईल सिटी भागात ये-जा करण्यासाठी जीव धोक्यात घालून रस्ता ओलांडावा लागत आहे. त्यामुळे महापालिका व पीएमपी यांनी उपाययोजना करून प्रश्न सोडवावा.
- मोनल महादेवी
महिलांनी बीआरटी लेनमधून होणारी घुसखोरी रोखण्याचा अनुभव खूप वेगळा होता. वाहनांची घुसखोरी रोखण्यासाठी कायस्वरूपी तोडगा काढणे आवश्यक आहे. त्याकरिता नागरिकांनी अधिक सहभाग घेणे गरजेचे आहे. जेणेकरून संबंधित यंत्रणेला निर्णय घेणे भाग पडेल. - रोशनी रॉय
किवळे-सांगवी बीआरटी मार्गावर वाहनचालकांना व नागरिकांना सतत असुरक्षित वाटत असते. वाहतूक नियंत्रक दिवे सुरू ठेवणे आवश्यक आहे. मुकाई चौक ते रावेत दरम्यान गतीने बीआरटी लेनमधून जाणाºया वाहनांचा व बसचा वेग खूप असतो. त्यामुळे अपघाताला निमंत्रण मिळत आहे. - शांती नेझर