प्रदीप कुरुलकरवर देशद्रोह व दहशतवादी कलमांतर्गत कारवाई करावी; संभाजी ब्रिगेडची मागणी
By ऑनलाइन लोकमत | Published: June 9, 2023 08:28 PM2023-06-09T20:28:07+5:302023-06-09T20:28:29+5:30
आरोपीवर देशद्रोह व दहशतवादी कलमाअंतर्गत पुढील दहा दिवसात कारवाई करावी अन्यथा संभाजी ब्रिगेडतर्फे उच्च न्यायालयात दावा दाखल करणार
पिंपरी : संरक्षण विभागाच्या पुणे येथील डीआरडीओ या संस्थेतील शास्त्रज्ञ प्रदीप कुरुलकर याला एटीएसने अटक केली आहे. त्याने बेकायदेशीर कृती करून देशद्रोहासारखे गंभीर गुन्हे केले असल्याचे प्रथम दर्शनी दिसत आहे. त्यामुळे कुरुलकर याच्यावर देशद्रोह व दहशतवादी कलमांतर्गत कारवाई करावी, अशी मागणाी संभाजी ब्रिगेडतर्फे शुक्रवारी पिंपरी येथे झालेल्या पत्रकार परिषदेत करण्यात आली.
संभाजी ब्रिगेडचेपुणे जिल्हाध्यक्ष गणेश दहिभाते, पिंपरी -चिंचवड शहराध्यक्ष सतीश काळे, शहर कार्याध्यक्ष ज्ञानेश्वर लोभे, जिल्हा सचिव गणेश कुंजीर, ॲड. तोसिफ शेख, ॲड. क्रांती सहाणे, ज्येष्ठ नेते मानव कांबळे, माजी नगरसेवक मारुती भापकर, प्रकाश जाधव, सिद्धिक शेख, कामगार नेते काशिनाथ नखाते उपस्थित होते.
गणेश दहीभाते म्हणाले, डीआरडीओ ही भारत सरकारच्या संरक्षण मंत्रालयातील संरक्षण संशोधन आणि विकास विभाग अंतर्गत काम करणारी देशातील प्रमुख संस्था आहे. या संस्थेत लष्कराच्या संशोधन आणि विकास कार्यासाठी काम सुरू असते. कुरुलकर या संस्थेत संशोधन अधिकारी म्हणून काम करीत होता. त्याने सोशल मीडिया तसेच फोन कॉल्स आणि व्हाट्सअप व्हिडिओ कॉल द्वारे पाकिस्तान मधील गुप्तचर संस्थेला भारतीय लष्करातील क्षेपणास्त्र संदर्भची अत्यंत गोपनीय माहिती पुरवली असल्याचे माध्यमांद्वारे समजले आहे. तसेच त्याने डिप्लोमॅट पासपोर्टवर परदेश दौरे केले असल्याचे निदर्शनास आले आहे. त्याच्या गुन्ह्याचे स्वरूप पाहता त्याच्यावर देशद्रोह आणि दहशतवादी कलम अंतर्गत कारवाई होणे आवश्यक आहे. तसेच या प्रकरणाचा तपास एनआयएकडे देण्यात यावा. मात्र तपास यंत्रणा जाणीवपूर्वक या कलमांतर्गत कारवाई न करता आर्म ऍक्ट अंतर्गत कारवाई करीत असल्याचे दिसत आहे. या आरोपीवर देशद्रोह व दहशतवादी कलमाअंतर्गत पुढील दहा दिवसात कारवाई करावी अन्यथा संभाजी ब्रिगेडतर्फे उच्च न्यायालयात दावा दाखल करू व रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन करण्यात येईल.