शहराच्या सौंदर्याला बाधा आणणाऱ्या होर्डिंग्सवर लोणावळा नगरपरिषदेची कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 15, 2017 04:10 PM2017-12-15T16:10:35+5:302017-12-15T16:43:14+5:30
लोणावळा शहरातील सर्व लहान मोठ्या होर्डिंग्सवर लोणावळा नगरपरिषदेच्या वतीने आजपासून कारवाई मोहीम सुरु करण्यात आली आहे.
लोणावळा : लोणावळा शहरातील सर्व लहान मोठ्या होर्डिंग्सवर लोणावळा नगरपरिषदेच्या वतीने आजपासून कारवाई मोहीम सुरु करण्यात आली आहे. १५४ बोर्डांची यादी तयार करण्यात आली असल्याचे नगरपरिषदेच्या वतीने सांगण्यात आले. कुमार चौक ते खंडाळा दरम्यान आज राष्ट्रीय महामार्गाच्या दुतर्फा ही कारवाई करण्यात आली.
लोणावळा व खंडाळा परिसरातील मोठमोठ्या होर्डिंग्समुळे शहराच्या सौंदर्याला बांधा निर्माण होत आहे, तसेच शहर बकाल दिसत असल्याने सर्व होर्डिंग्स बोर्ड काढण्याचा निर्णय लोणावळा नगरपरिषदेने घेतला असून तसा ठराव देखील केला आहे. त्या अनुषंगाने आज नगरपरिषदेच्या वतीने ही कारवाई मोहीम सुरु करण्यात आली आहे. हे सर्व बोर्ड काढल्यानंतर जागांचे लिलाव करुन नव्याने बोर्ड लावण्यास परवानगी देण्यात येणार आहे. मात्र यापुढे शहरात कोठेही दहा बाय दहा आकारांच्या बोर्डपेक्षा मोठ्या बोर्डांना परवानगी देण्यात येणार नाही. तसेच दोन बोर्डमध्ये किमान शंभर ते दोनशे मिटरचे अंतर ठेवण्याचे धोरण ठरविण्यात येणार असल्याचे नगरपरिषद प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आले.