अनधिकृत बांधकामांवर केली कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 3, 2017 02:40 AM2017-08-03T02:40:20+5:302017-08-03T02:40:20+5:30
महापालिकेच्या अनधिकृत बांधकाम नियंत्रण विभाग व अतिक्रमण पथकाच्या वतीने संत तुकारामनगर, मासूळकर कॉलनी या परिसरात सुरू असलेल्या अनधिकृत बांधकामावर जेसीबी व ब्रेकरच्या साहाय्याने कारवाई करून
नेहरुनगर : महापालिकेच्या अनधिकृत बांधकाम नियंत्रण विभाग व अतिक्रमण पथकाच्या वतीने संत तुकारामनगर, मासूळकर कॉलनी या परिसरात सुरू असलेल्या अनधिकृत बांधकामावर जेसीबी व ब्रेकरच्या साहाय्याने कारवाई करून ३२६९ चौरस फूट बांधकामावर कारवाई करण्यात आली.
संत तुकारामनगर येथील परिसरात अनेक नागरिकांनी वाढीव बांधकामे केली असून, काहींनी अनधिकृत बांधकामे करून खोल्या भाड्याने दिल्या आहेत. या भागात हा एक प्रकारे धंदा झाला आहे. २७ जुलैला या भागात एका घरावर सुरू असलेल्या अनधिकृत वाढीव बांधकामाची भिंत एका चौदावर्षीय मुलाच्या डोक्यावर कोसळली. या घटनेत त्याच्या डोक्याला गंभीर इजा झाली होती. त्याचबरोबर चार दुचाक्यांचे नुकसानदेखील झाले होते.
या घटनेची दखल घेत महापालिकेने कार्यकारी अभियंता मनोज सेठिया यांच्या मार्गदर्शनाखाली महापालिकेच्या अनधिकृत बांधकाम नियंत्रण विभाग व अतिक्रमण पथकाच्या वतीने संत तुकारामनगर येथील मंगलसेन बहल उद्यान, अन्तोनी उद्यान, आचार्य अत्रे रंगमंदिर, अमरज्योत मित्र मंडळ व मासूळकर कॉलनी येथील रसरंग चौकाजवळ मुख्य रस्त्यालगत बांधण्यात आलेले दुकान जमीनदोस्त केले. या दोन्ही परिसरातील सहा ठिकाणी सुरूअसलेल्या अनधिकृत बांधकामावर जेसीबी व ब्रेकरच्या साहाय्याने कारवाई केली.