विनापरवाना फटाका स्टॉलवर कारवाई
By admin | Published: October 27, 2016 05:07 AM2016-10-27T05:07:34+5:302016-10-27T05:07:34+5:30
अग्निशामक विभागाचा आणि पोलिसांचा परवाना न घेता शहरात अनेक ठिकाणी फटाका स्टॉल उभारले आहेत. नियम, अटींचे पालन न करता अत्यंत धोकादायक पद्धतीने
पिंपरी : अग्निशामक विभागाचा आणि पोलिसांचा परवाना न घेता शहरात अनेक ठिकाणी फटाका स्टॉल उभारले आहेत. नियम, अटींचे पालन न करता अत्यंत धोकादायक पद्धतीने ज्यांनी फटाका स्टॉल उभारले आहेत, त्यांच्यावर पोलिसांतर्फे कारवाई केली जाणार आहे, अशी माहिती परिमंडल तीनचे सहायक पोलीस आयुक्त राम मांडुुरके यांनी दिली.
अग्निशामक विभागातर्फे फक्त ९२ फटाका विक्रेत्यांना स्टॉलसाठी परवानगी दिली असताना प्रत्यक्षात हजारो दुकाने ठिकठिकाणी थाटलेली आहेत. या विक्रेत्यांनी सुरक्षिततेच्या दृष्टीने दक्षता घेतलेल्या नाहीत. लोकवस्तीच्या भागात उभारलेले फटाका स्टॉल दुर्घटनेस कारणीभूत ठरू शकतात. पोलिसांनी याची गांभीर्याने दखल घेतली आहे. सर्व पोलीस ठाण्यांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना त्यांच्या पोलीस ठाण्याच्या हद्दीतील अशा दुकानांवर कारवाई करण्याच्या सूचना दिल्या आहेत. महापालिकेत या संदर्भात अधिकाऱ्यांबरोबर बैठक आयोजित केली आहे. या बैठकीत महापालिका अधिकाऱ्यांनाही योग्य त्या दक्षता घेण्याच्या सूचना दिल्या जाणार आहेत.
फटाका विक्री दुकानासाठी ना हरकत दाखला देताना अग्निशामक विभागातर्फे संबंधित व्यक्तीचे दुकान सुरक्षित ठिकाणी आहे का, याची पाहणी केली जाते. (प्रतिनिधी)
- लोकवस्तीच्या बाहेर मोकळ्या पटांगणावर अशी दुकाने थाटण्यास तात्पुरत्या स्वरूपात परवानगी दिली जाते. दुकान हे आरसीसी बांधकाम आणि शटर असलेले असावे, पक्के बांधकाम असलेले दुकान नसेल, तर मोकळ्या जागेत पत्र्यांच्या शेडमध्ये दुकान उभारावे, दुकानामध्ये आग विझविण्याचे उपकरण बसवावे, तसेच किराणा, इलेक्ट्रिक साहित्य, कपडे आणि स्फोटक रसायने असलेल्या दुकानांच्या शेजारी स्टॉल उभारू नये, असे नियम असताना, ते नियम धाब्यावर बसवून अनेकांनी दुकाने थाटली आहेत. या दुकानांवर कारवाई केली जाणार आहे.