दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करणार
By admin | Published: November 6, 2016 04:26 AM2016-11-06T04:26:58+5:302016-11-06T04:26:58+5:30
नव्याने खरेदी केलेल्या वाहनांची योग्य प्रकारे पाहणी न करता उपप्रादेशिक परिवहन कार्यालयातर्फे पासिंग केले जात आहे. वितरकांशी असलेले हितसंबंध जपले जात असल्याने जुजबी कागदपत्रे
पिंपरी : नव्याने खरेदी केलेल्या वाहनांची योग्य प्रकारे पाहणी न करता उपप्रादेशिक परिवहन कार्यालयातर्फे पासिंग केले जात आहे. वितरकांशी असलेले हितसंबंध जपले जात असल्याने जुजबी कागदपत्रे पाहूनच अधिकारी पासिंगसाठी स्वाक्षरी करीत असल्याचा गंभीर प्रकार ‘लोकमत’ने केलेल्या स्टिंग आॅपरेशनमध्ये उघडकीस आला आहे़ याप्रकरणाची प्रादेशिक परिवहन अधिकारी जितेंद्र पाटील यांनी गंभीर दखल घेतली आहे. उपप्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांना याबाबत चौकशी करून दोषींवर कडक कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
यंदा दसरा व दिवाळीच्या मुहूर्तावर खरेदी करण्यात आलेल्या वाहनांचे बुकिंग अगोदरचे दाखविण्यात आले. दिवाळीत लागू झालेल्या सरचार्ज चुकविण्यासाठी आगाऊ बुकिंगचा फंडा वापरात आणला. काही वितरकांनी ‘हॅँडलिंग चार्जेस’च्या नावाखाली ग्राहकांकडून जादा पैसे उकळले. दुचाकी वाहनांसाठी एक हजार व चारकाही वाहनांसाठी पाच हजार रुपये रक्कम वसूल केली जात आहे. हॅँडलिंग चार्जेस दिल्यानंतर पासिंगसाठी ग्राहकांना त्रास दिला जात नाही. सर्वकाही सेटिंग आपोआप होते. मात्र, परिवहन विभागाच्या नियमाला वाटाण्याच्या अक्षता लावण्याचा हा धक्कादायक प्रकार ‘लोकमत’ने उजेडात आणला.
एकाच वेळी अनेक गाड्यांचे पेपर निरीक्षकाकडे सादर करून संबंधित वितरकांकडील कर्मचारी सहजपणे कागदपत्रांवर अधिकाऱ्यांची स्वाक्षरी मिळवतात. ही बाब गंभीर असल्याने अधिकाऱ्यांनी याबाबतची माहिती मागवली आहे. पिंपरी चिंचवड उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाचे अधिकारी अजित शिंदे यांनीसुद्धा असा काही प्रकार घडत असेल, तर त्यावर निश्चित कारवाई केली जाईल, असे नमूद केले. हॅँडलिंग चार्जेसच्या नावाखाली कोणी वाहनवितरक ग्राहकांकडून पैसे उकळत असेल, कोणाची त्याबद्दल तक्रार असेल, तर नेमकी कारवाई करता येईल. नागरिकांनी स्वत: पुढे येऊन त्याविषयीची तक्रार करावी, असेही त्यांनी सांगितले. (प्रतिनिधी)
नवीन वाहनांची जुजबी कागदपत्रे पाहूनच पासिंग होत असल्याच्या प्रकाराची गंभीर दखल घेण्यात येईल. याप्रकरणाची उपप्रादेशिक परिवहन अधिकारी यांच्यामार्फत चौकशी करून दोषींवर कडक कारवाई करण्यात येईल.
- जितेंद्र पाटील,
प्रादेशिक परिवहन अधिकारी