पावसाळ्यात रस्ता खोदाल तर होईल कारवाई; पिंपरी-चिंचवड महापालिकेचा इशारा
By ऑनलाइन लोकमत | Published: May 24, 2023 03:43 PM2023-05-24T15:43:43+5:302023-05-24T15:46:18+5:30
महापालिकेचे आदेश डावलून रस्ते खोदाई करणाऱ्यांवर यापुढील काळात कारवाईचा इशारा महापालिकेच्या स्थापत्य विभागाने दिला आहे...
पिंपरी : मान्सून दाखल होण्यापूर्वी शहरातील खड्डे बुजवले जातात. तसेच १५ मे नंतर शहरामध्ये रस्ते खोदाई बंद करून रस्त्यांची दुरुस्ती केली जाते. पावसाळ्यात रस्ते खोदाईमुळे शहरातील रस्त्यांची दुरवस्था होऊन अपघाताचा धोका असतो. महापालिकेने १५ मेपासून शहरात कोणत्याही प्रकारे रस्ते खोदाई करू नये, असे आदेश दिले आहे. त्यामुळे महापालिकेचे आदेश डावलून रस्ते खोदाई करणाऱ्यांवर यापुढील काळात कारवाईचा इशारा महापालिकेच्या स्थापत्य विभागाने दिला आहे.
शहरामध्ये सार्वजनिक आणि खासगी सेवा-सुविधांच्या निर्मितीसाठी खोदाई सुरू होती. त्यासाठी खोदाई शुल्क भरून महापालिकेकडून परवानगी घ्यावी लागते. तर पावसाळ्यात खोदाई पूर्णपणे बंद ठेवावी लागते. मात्र, दोन वर्षांपूर्वी तत्कालीन आयुक्त राजेश पाटील यांनी स्मार्ट सिटीच्या खोदकामाला भर पावसाळ्यात परवानगी दिली होती. तेव्हापासून शहरात पावसाळ्यात खोदकाम होते. आवश्यक कामांच्या नावाखाली पालिका कंत्राटदार व इतर सार्वजनिक आणि खासगी संस्थांकडून पावसाळ्यातही रस्ते खोदाई सुरू असते. त्यामुळे रस्त्यांची दुरवस्था होऊन अपघातांना निमंत्रण मिळते.
दरम्यान, महापालिका आयुक्त यांच्या आदेशानुसार सर्व यंत्रणांना १५ मे ते १५ ऑक्टोबर २०२३ या कालावधीत रस्ते खोदाई बंद करण्याचे आदेश दिले आहेत.
त्यानुसार शहरात १५ मेपासून रस्ते खोदाई बंद करण्यात आल्याचा दावा महापालिका अधिकाऱ्यांनी केला आहे. या कालावधीत रस्ते खोदाई बंद ठेवण्यात यावी. खोदलेले रस्ते पूर्ववत करावेत. अपवादात्मक परिस्थितीत रस्ते खोदाई करण्याची आवश्यकता असल्यास त्यांनी महापालिकेची मान्यता घ्यावी, असा प्रस्ताव शहर अभियंता यांची पूर्वमान्यता घेऊन आयुक्त यांच्याकडे सादर करावेत, असे आदेशात म्हटले आहे.
सद्यस्थितीत खासगी संस्थेला रस्ते खोदाईसाठी परवानगी दिलेली नाही. ड्रेनेज, पाणीपुरवठा यांची किरकोळ महापालिकेची कामे असली तर त्यासाठी खोदाई केली जाते. मात्र, खासगी एकाही संस्थेला सध्या खोदकाम करण्यासाठी परवानगी नाही.
- ज्ञानदेव जुंधारे, सह शहर अभियंता