पालिका निवडणुकीसाठी इच्छुक झाले ‘अॅक्टिव्ह’
By admin | Published: March 14, 2016 01:12 AM2016-03-14T01:12:19+5:302016-03-14T01:12:19+5:30
महापालिका निवडणूक जसजशी जवळ येऊ लागली आहे.,तसतसे इच्छुकही ‘अॅक्टिव्ह’ होऊ लागले आहेत. विविध मागण्यांचे निवेदन देण्याचे प्रमाण वाढले असून, मोठ्या व्यक्तींवर टीका
पिंपरी : महापालिका निवडणूक जसजशी जवळ येऊ लागली आहे.,तसतसे इच्छुकही ‘अॅक्टिव्ह’ होऊ लागले आहेत. विविध मागण्यांचे निवेदन देण्याचे प्रमाण वाढले असून, मोठ्या व्यक्तींवर टीका, आरोप करण्याचे प्रकारही सध्या दररोज पाहायला मिळत आहेत. यासह आंदोलन, मोर्चा काढूनही इच्छुकांकडून लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला जात आहे.
महापालिकेची निवडणूक काही महिन्यांवर येऊन ठेपली आहे. या निवडणुकीसाठी इच्छुक असलेले गुडघ्याला बाशिंग बांधून तयार आहेत. मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी वेगवेगळ्या युक्त्या लढविल्या जात आहेत. घरोघरी जाऊन नागरिकांची भेट घेण्यासह छोटे-मोठे उपक्रम राबविले जात आहेत. काही इच्छुक असे आहेत की, ते मतदारांना माहितीच नाहीत, की फारसे परिचितदेखील नाहीत. गेल्या पाच वर्षांत कधी नजरेस न पडणारे चेहरेही सध्या ठिकठिकाणी दिसू लागले आहेत. मतदारांचे आपल्याकडे लक्ष वेधले जावे यासाठी विविध मागण्यांचे निवेदन देणे, मोर्चा, आंदोलन करणे, असे प्रकार सुरू झाले आहेत. वर्षानुवर्षे ज्या समस्येचे घेणे-देणेही नव्हते, अशा समस्या सोडविण्यासाठी इच्छुक आता जागे झाल्याचे दिसत आहे. कोणत्याही छोट्या-मोठ्या विषयाचे पत्रक काढून प्रसिद्धी मिळवायची अथवा चर्चेत यायचे, इतकाच त्यांचा उद्देश असल्याचे दिसते.
वेगवेगळ्या समस्या सोडविण्याचे आश्वासन दिले जात आहे. आंदोलन करण्यासह छोट्या कारणांवरूनही पत्रकबाजी केली जात आहे. विविध प्रशासकीय अधिकाऱ्यांसह वर्तमानपत्रांना प्रसिद्धीसाठी निवेदन देणाऱ्यांची संख्या वाढू लागली आहे. निवेदन दिले जाते, मागणी केली
जाते; मात्र ती वस्तुस्थितीला धरून आहे की नाही, याचाही विचार केला जात नाही. केवळ निवेदन काढून प्रसिद्धी मिळवित आहेत. (प्रतिनिधी)