आदर्श विद्यालयाच्या इमारतीवर हातोडा, तहसीलदारांचे आदेश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 14, 2018 01:57 AM2018-07-14T01:57:30+5:302018-07-14T01:57:46+5:30
- तळेगाव येथील शासनाच्या जागेतील शासकीय-निमशासकीय सेवेतील अधिकाऱ्यांच्या विपराव सहकारी गृहरचना संस्थेच्या ४४ गुंठे जागेपैकी २० गुंठ्यात मावळ शिक्षण प्रतिष्ठानच्या आदर्श विद्या मंदिर व कनिष्ठ महाविद्यालय, तसेच सावित्रीबाई फुले महिला महाविद्यालयाच्या इमारतीचे अनधिकृतपणे बांधकाम केले आहे.
तळेगाव स्टेशन - तळेगाव येथील शासनाच्या जागेतील शासकीय-निमशासकीय सेवेतील अधिकाऱ्यांच्या विपराव सहकारी गृहरचना संस्थेच्या ४४ गुंठे जागेपैकी २० गुंठ्यात मावळ शिक्षण प्रतिष्ठानच्या आदर्श विद्या मंदिर व कनिष्ठ महाविद्यालय, तसेच सावित्रीबाई फुले महिला महाविद्यालयाच्या इमारतीचे अनधिकृतपणे बांधकाम केले आहे. त्यामुळे शासकीय जागेतील मावळ शिक्षण प्रतिष्ठानची इमारत त्वरित पाडण्याचे आदेश मावळ तहसीलदार रणजित देसाई यांनी तळेगाव दाभाडे नगर परिषदेच्या मुख्याधिकारी वैभव आवारे यांना नुकतेच दिले.
तळेगाव दाभाडे नगर परिषदेच्या हद्दीतील ही जागा शासकीय मालकीची आहे. या अनधिकृतपणे बांधलेल्या इमारतीवर त्वरित कारवाई करून विपराव सहकारी गृहरचना संस्थेला जागा परत करावी,अशी मागणी माहिती अधिकारी कार्यकर्ते प्रदीप नाईक यांनी केली आहे. विपराव संस्थेचे पदाधिकाºयांनी जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांच्याकडे तक्रार केली होती. त्यांनतर तहसीलदार देसाई यांनी इमारत पाडण्याचा आदेश दिले आहेत.
नगर परिषदेच्या शेजारीच सर्व्हे नंबर ५३४ व ५३६ येथे ४,०६६.४६ चौरस मीटर शासकीय जागा होती. त्यात शासकीय- निमशासकीय सेवेतील अधिकाºयांची विपराव सहकारी गृहरचना संस्था ४४ गुंठे जागेचा नगरविकास विभागाकडे असलेल्या २००२ सालीच्या प्रस्तावाला मंजुरी मिळाली आहे. साधारण ५५ कुटुंबीयांसाठी गृहरचना संस्थेला मंजुरी मिळाली. २००५ साली जमिनीचे शासकीय मूल्य शासनाकडे जमा केले आहे.
दरम्यान, २००८-०९ कालावधीत मावळ शिक्षण प्रतिष्ठानने विपराव सहकारी गृहरचना संस्थेच्या जागेत अनधिकृतपणे अतिक्रमण करून आदर्श विद्या मंदिर, कनिष्ठ महाविद्यालय आणि सावित्रीबाई फुले महिला महाविद्यालयाच्या इमारतीचे बांधकाम केले आहे.
मुंबई उच्च न्यायालयाने (दि. १९ जुलै २०१७) रोजी मावळ शिक्षण प्रतिष्ठानने गृहरचना संस्थेच्या जागेवर केलेल्या बांधकामावर कारवाई करून या प्रकरणाची सखोल चौकशी करून त्या जागेवर बांधलेल्या शाळा महाविद्यालयाच्या इमारतीची माहिती देण्याचे आदेश दिले़ त्यावर कारवाई करावी. त्या बांधकामासाठी परवानगी नसल्यास कायदेशीर कारवाई करण्यात यावी. नगर परिषदेकडून
त्या शाळेचा नकाशा (ब्लू प्रिंट)
मंजूर आहे का असल्यास त्याची माहिती देण्यात यावी. नसल्यास त्यावर योग्य ती कारवाई करण्यात यावी. सातबारा कोणाच्या नावे आहे, याची संपूर्ण सखोल माहिती आम्हाला देण्यात यावी, असा आदेश दिला होता.
वैभव आवारे : तहसीलदारांना विचारून निर्णय
मावळ शिक्षण प्रतिष्ठानच्या आदर्श विद्या मंदिर, कनिष्ठ महाविद्यालय तसेच सावित्रीबाई फुले महिला महाविद्यालयाच्या इमारतीचे तसेच संरक्षक भिंतीचे अतिक्रमण नगरपालिकेच्या जागेत नसून, शासकीय जागेत आहे़ त्यामुळे ती कारवाई आम्हाला करता येते का याबाबत निर्णय घेऊन तहसीलदार यांना कळविणार आहे. आमच्या माहितीनुसार ते काम शासकीय प्रशासनाचे आहे़
- वैभव आवारे, मुख्याधिकारी तळेगाव दाभाडे नगर परिषद मुख्याधिकारी
तळेगाव दाभाडे नगर परिषदेच्या हद्दीत शासकीय जागा असून, त्या जागेतील विपराव सहकारी गृहरचना संस्थेच्या जागेत मावळ शिक्षण प्रतिष्ठानने अतिक्रमण केले असून, उच्च न्यायालय व जिल्हाधिकारी कार्यालयाने संबंधित बांधकाम पाडण्याचा आदेश दिला आहे. त्यानुसार तळेगाव दाभाडे नगर परिषद मुख्याधिकारी वैभव आवारे यांना मावळ शिक्षण प्रतिष्ठानचे अनधिकृत बांधकाम त्वरित पाडण्याचे लेखी आदेश दिले आहेत.
- रणजित देसाई, तहसीलदार