बसस्थानक समस्यांच्या विळख्यात
By admin | Published: December 23, 2016 12:37 AM2016-12-23T00:37:58+5:302016-12-23T00:37:58+5:30
येथील पीएमपी बस स्थानकात अनेक समस्या आहेत. अतिक्रमण, रिक्षाचालकांचा वेढा यामुळे या ठिकाणी वारंवार किरकोळ अपघात होत
निगडी : येथील पीएमपी बस स्थानकात अनेक समस्या आहेत. अतिक्रमण, रिक्षाचालकांचा वेढा यामुळे या ठिकाणी वारंवार किरकोळ अपघात होत आहेत. येथील समस्या सोडवाव्यात, अशी मागणी नागरिकांतून होत आहे.
पुणे-मुंबई महामार्गावर हे स्थानक आहे. या ठिकाणाहून विविध मार्गांवर बस जातात. विविध शाळा, कॉलेज या भागात असल्याने पुण्याहून तसेच शहरातून अनेक विद्यार्थ्यांची या ठिकाणी ये-जा सुरू असते. येथे मोठ्याप्रमाणात गर्दी असते.
आयटीनगरीकडे जाणाऱ्या चाकरमान्यांची गर्दी असते. येथील बसशेडची जागा अपुरी आहे. बसशेडसमोर बस उभ्या केल्या जातात. त्यामुळे प्रवाशांना बस दिसत नाहीत. त्यामुळे बस पकडण्यासाठी प्रवाशांची धावपळ होते. यामुळे अनेक वेळा किरकोळ अपघात होतात. या ठिकाणी असणारे वेळापत्रकही अडचणीत लावण्यात आले आहे. ते वेळापत्रक दिसत नसल्याने प्रवाशांना नाहक त्रास होतो.
येथील अतिक्रमण हा चर्चेचा विषय आहे. बसस्थानकासमोर विक्रेत्यांनी दुकाने थाटली आहेत. त्यामुळे रस्ता अरुंद होतो. या ठिकाणी येणारे ग्राहक रस्त्यावर वाहने उभी करतात. त्यामुळे अरुंद रस्ता पुन्हा अरुंद होतो. रिक्षाचालक रिक्षा रस्त्यावर उभ्या करतात. ते बसचे प्रवासी राजरोसपणे पळवून नेतात. त्यामुळे पीएमपीच्या उत्पन्नावरही मोठ्या प्रमाणात परिणाम होतो. पण या प्रकाराकडे कोणीच गांभीर्याने पाहत नाही. त्यामुळे रिक्षाचालकांचे फावते. अशीच परिस्थिती भोसरीकडे जाणाऱ्या गाड्यासाठी उभारण्यात आलेल्या थांब्याची आहे.
या ठिकाणी मोठ्या प्रमाणात भिकाऱ्यांचा वावर असतो. बराच वेळा अनेक वस्तू चोरण्याचे प्रकार घडतात. तसेच बसमध्ये बसताना पाकीट मारणे, मोबाईलची चोरी करणे अशाही घटना घडल्या आहेत. या ठिकाणी पोलिसाची नियुक्ती करावी अशी मागणी प्रवाशांतून होत आहे. परंतु त्याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे. (वार्ताहर)