PCMC | राजाप्रमाणे प्रधानांचेही पावलावर पाऊल! अतिरिक्त आयुक्तही भेटणार फक्त ३ दिवस
By ऑनलाइन लोकमत | Published: December 16, 2022 11:01 AM2022-12-16T11:01:33+5:302022-12-16T11:03:04+5:30
नागरिकांना भेटण्यासाठी आठवड्यातून तीनच दिवस....
पिंपरी : महापालिकेत आयुक्त बदलल्यानंतर नवीन कायदे आणि नियम रुढ होतात. शेखर सिंह आयुक्तपदी रुजू झाल्यानंतर नागरिकांना भेटण्याच्या वेळेत त्यांनी बदल केला. त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवून अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटील यांनीही नागरिकांना भेटण्यासाठी आठवड्यातून तीनच दिवस असतील, अशी नोटीस दालनाबाहेर लावली आहे.
पिंपरी-चिंचवड महापालिकेत विविध कामांसाठी नागरिक आणि लोकप्रतिनिधी येत असतात. आयुक्तालयात अधिकारी कार्यालयीन वेळेत उपलब्ध असले, तरी नागरिकांना भेटण्यासाठी विशिष्ट वेळ ठेवण्यात आलेला असतो. किंवा आयुक्तांची वेळ घेऊनही नागरिकांना भेटायला येत असतात. तसेच आयुक्त दौऱ्यांवर किंवा कामात असतील तर अतिरिक्त आयुक्तही नागरिकांचे प्रश्न जाणून घेत असतात.
महापालिकेत रुजू झाल्यानंतर आयुक्त सिंह यांनीही नवीन नियम घालून दिला आहे. आठवड्यातून मंगळवार, गुरुवार आणि शुक्रवार या दिवशी नागरिकांना भेटण्यासाठी वेळ देण्यात आली आहे. आठवड्यातून तीनच दिवस आयुक्त नागरिकांना भेटणार आहेत. त्यानंतर आता अतिरिक्त आयुक्तांनी दालनाबाहेर नोटीस लावली आहे. अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळेपाटील हेही सोमवार, बुधवार आणि शुक्रवार या दिवशी नागरिकांचे प्रश्न जाणून घेणार आहेत. अर्थात, आयुक्त नसतील त्या दिवशी नागरिकांचे प्रश्न अतिरिक्त आयुक्त जाणून घेणार आहेत.
कामकाजाचा भाग म्हणून सूचना लावली आहे. इतरवेळीही नागरिक वेळ घेऊन भेटायला येऊ शकतात, असे अतिरिक्त आयुक्तांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.