आरटीईच्या विद्यार्थ्यांकडून अतिरिक्त वसुली
By admin | Published: March 24, 2017 04:15 AM2017-03-24T04:15:04+5:302017-03-24T04:15:04+5:30
आरटीई अंतर्गत प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांकडून काही शाळांनी अतिरिक्त खर्चाची वसुली सुरू केली आहे, अशी तक्रार काही
पिंपरी : आरटीई अंतर्गत प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांकडून काही शाळांनी अतिरिक्त खर्चाची वसुली सुरू केली आहे, अशी तक्रार काही पालकांनी केली आहे. मात्र, शासनाकडून आरटीईच्या विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक शुल्काचा परतावा मिळत नसल्याने शाळेच्या अन्य उपक्रमांसाठीचा खर्च पालकांकडून घेतला जात
असल्याचे शिक्षण संस्था संचालकांचे म्हणणे आहे.
पिंपरी-चिंचवड शहरामध्ये आरटीई प्रवेशाचा गोंधळ सुरू आहे. गेले पाच वर्ष शासनाकडून शैक्षणिक संस्थाना आरटीई अंतर्गत शैक्षणिक प्रवेश शुल्काचा परतावा देण्यात आलेला नाही. त्यामुळे शाळांचे आर्थिक बजेट कोलमडले आहे. तसेच शासनाकडून फक्त शैक्षणिक शुल्क परतावा मिळणार आहे, विद्यार्थ्यांचा उर्वरित खर्च कसा करावा, असा प्रश्न शाळा व्यवस्थानपनासमोर आहे. आरटीई विद्यार्थ्यांच्या विविध शाळेतील उपक्रमांच्या खर्चाचा बोजा अन्य विद्यार्थ्यांवर टाकण्याऐवजी संबंधित विद्यार्थ्यांच्या पालकांकडून घेतला जात आहे. मात्र, आरटीई अंतर्गत प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांची आर्थिक परिस्थिती चागंली नसते.पाल्यांना उच्चप्रतीचे शिक्षण मिळावे, यासाठी पालक आरटीईचे प्रवेश घेतात. मात्र, खासगी शाळांतील खर्च या पालकांना परवडत नाही. त्यामुळे संबंधित खर्चही शासनाने द्यावा, अशी पालकांची मागणी आहे.
शाळेत पुरविण्यात येणाऱ्या ई-लर्निंग आणि इतर सुविधांचा खर्च आरटीई प्रवेशातील विद्यार्थ्यांकडून आकारला जात आहे. त्यामुळे पालकांना आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे, त्यामुळे शाळेत प्रवेश मिळूनही पालक हवालदिल झाले आहेत. याबाबत शासनाने योग्य निर्णय तातडीने घ्यावा, अशी पालकांची मागणी आहे. (प्रतिनिधी)