प्रशासन-शाळांच्या वादात रखडले प्रवेश
By admin | Published: April 2, 2016 03:35 AM2016-04-02T03:35:41+5:302016-04-02T03:35:41+5:30
आरटीई २५ टक्के परतावा व काही शाळांचा आरटीई प्रवेशास नकार असल्याने शिक्षण मंडळ प्रशासनाने शाळांना नोटिसा पाठविल्या आहेत. त्यामुळे काही शाळांची मान्यता रद्द होण्याची
पिंपरी : आरटीई २५ टक्के परतावा व काही शाळांचा आरटीई प्रवेशास नकार असल्याने शिक्षण मंडळ प्रशासनाने शाळांना नोटिसा पाठविल्या आहेत. त्यामुळे काही शाळांची मान्यता रद्द होण्याची शक्यता आहे.
आरटीई प्रवेशासाठी युडायसच्या रिपोर्टप्रमाणे एकूण १५० शाळा पात्र आहेत. अद्यापपर्यंत १५० शाळांपैकी १२ शाळांनी आरटीई २५ टक्के आरक्षणासाठी वेबसाइटवर नोंद केलेली नाही. त्यामुळे पालकांची मात्र प्रवेशासाठी धावपळ उडाली आहे. पालकवर्ग मात्र आरटीई प्रवेशासाठी प्रशासनाकडे चौकशी करीत आहेत.
शहरातील १० ते २० हजार पालक आरटीई प्रवेशाकडे डोळे लावून बसले आहेत. इकडे मात्र प्रशासन, विविध संघटना, विनाअनुदानित व कायम विनाअनुदानित शाळांमध्ये वाद सुरू आहेत. प्रवेशासाठी एप्रिल उजाडला, तरीही शाळा नोंदणीच पूर्ण नाही.
आरटीई २५ टक्के प्रवेशासाठी शाळा नोंदणी १६ ते २२ मार्चपर्यंत ठेवण्यात आली होती. त्यानंतर
एक आठवडा पुन्हा २४ एप्रिल
पर्यंत शाळा नोंदणीची मुदत वाढविण्यात आली. त्यानंतर
त्वरित विद्यार्थ्यांचे प्रवेश सुरू केले जाणार होते. मात्र, अद्यापपर्यंत शाळा नोंदणीच पूर्ण झालेली नसल्याने आरटीई २५ टक्के प्रवेशास सुरुवात झाली नाही. (प्रतिनिधी)
२०१३-१४ या वर्षातील आरटीईचा परतावा चार महिन्यांपूर्वी मिळाला आहे. मात्र, या वर्षामधील ३४ टक्के परतावा बाकी आहे. तसेच २०१४-१५ या वर्षातील ४० टक्के रक्कम मिळाली आहे. उर्वरित परतावा शिल्लक आहे. याबद्दल शासनाने अद्यापपर्यंत काहीच ठोस माहिती न दिल्याने आरटीई शाळा प्रवेश केलेला नाही. वेबसाइटही वारंवार बंद असते.
- राजेंद्र दायमा, उपाध्यक्ष, इंडिपेंडंट इंग्लिश स्कूल असोसिएशन
दोन ते तीन दिवसांत शाळा नोंदणी पूर्ण होईल. त्यानंतर त्वरित आरटीई प्रवेश सुरू होतील. याबाबत आयुक्तांसोबत बैठक झाली आहे. शाळांचा शिल्लक आरटीई परतावा शाळांसोबत बैठक घेऊन तो विषय सोडविण्यात आला आहे. - बी. सी. कारेकर, प्रशासन अधिकारी