घोटाळ्याचा खुलासा करताना प्रशासनाची दमछाक
By admin | Published: June 17, 2017 03:36 AM2017-06-17T03:36:08+5:302017-06-17T03:36:08+5:30
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने आषाढी वारीतील वारकऱ्यांना देण्यात येणाऱ्या ताडपत्री खरेदीतील गैरव्यवहाराच्या विरोधकांच्या आरोपांमुळे सत्ताधारी
- लोकमत न्यूज नेटवर्क
पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने आषाढी वारीतील वारकऱ्यांना देण्यात येणाऱ्या ताडपत्री खरेदीतील गैरव्यवहाराच्या विरोधकांच्या आरोपांमुळे सत्ताधारी भाजपाच्या पदाधिकाऱ्यांसह व प्रशासनाचे धाबे दणाणले आहे. आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी तातडीने पत्रकार परिषद घेऊन स्पष्टीकरण देण्याचा प्रयत्न केला. मात्र, पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तर देताना आयुक्तांसह अधिकाऱ्यांची दमछाक झाली. महापौर नितीन काळजे
यांनीही दोषी अधिकाऱ्यांवर
कारवाई करण्याऐवजी प्रशासनाच्या सुरात सूर मिसळला.
आषाढी वारीतील दिंडीप्रमुखांना महापालिकेतर्फे दर वर्षी भेटवस्तू देण्यात येते. गेल्या वर्षी तत्कालीन सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसने मूर्ती घोटाळा केल्याचा आरोप भाजपाने केला होता. त्यानंतर या वर्षी विरोधकांनी भाजपाने ताडपत्री खरेदीत गैरव्यवहार केल्याचे प्रकरण उघडकीस आणले आहे. बाजारात २ हजार ४०० रुपयांना मिळणारी ताडपत्री भ्रष्टाचारमुक्त कारभाराचा नारा देणाऱ्या भाजपाच्या पदाधिकाऱ्यांनी ३ हजार ४१२ रुपयांना खरेदी केली. ६५० ताडपत्री खरेदीत तब्बल साडेसहा लाख रुपयांचा घोटाळा झाल्याचा आरोप राष्ट्रवादीसह विरोधी पक्षांनी केला आहे. त्यानंतर महापौर नितीन काळजे, स्थायी समिती सभापती सीमा सावळे, आयुक्त श्रावण हर्डीकर व भांडार विभागाचे प्रमुख प्रवीण अष्टीकर यांनी पत्रकार परिषद घेऊन खुलासा केला.
हर्डीकर म्हणाले, ‘‘ताडपत्री खरेदीची निविदा विहित पद्धतीने राबविण्यात आली आहे. पहिली निविदा २६ मे रोजी प्रसिद्ध केली. तिची मुदत सात दिवसांची होती. त्यात एकही ठेकेदार आला नाही. दोन जूनला दुसऱ्यांदा निविदा प्रसिद्ध झाली. त्यात एक जणाने निविदा सादर केली. त्यानंतर पुन्हा मुदतवाढ दिली. त्या वेळी रेखा इंजिनियरिंग, सिद्धी कॉपीयर्स, एमपी इंजिनियरिंग, धर्मे इंटरप्रायजेस, माणिकचंद हाऊस अशा पाच जणांनी निविदा सादर केल्या. त्यांपैकी अधिकृत वितरकाचे प्रमाणपत्र नसल्याने तीन ठेकेदारांना अपात्र ठरविण्यात आले. त्यापैकी कमी दराची निविदा म्हणून सिद्धी कॉपीयर्सला काम दिले.’’
ठेकेदारांचा बोलविता धनी वेगळाच आहे. नियमानुसार या प्रकरणाची चौकशी करण्यात येईल. तसेच पालिकेची बदनामी केली म्हणून संबंधित ठेकेदाराविरोधात गुन्हा दाखल करण्यात येईल.
- नितीन काळजे, महापौर
अनेक पुरवठादार राष्ट्रवादी कॉँग्रेसचे आहेत. ते आम्हाला विनाकारण त्रास देत आहेत. यापूर्वी महापालिकेत झालेल्या सर्व गैरव्यवहारांची आपण ‘अॅण्टिकरप्शन’ कडे तक्रार करणार आहोत.
- सीमा सावळे, अध्यक्ष, स्थायी समिती
ताडपत्री खरेदीची निविदा विहित पद्धतीने राबविण्यात आली आहे. पहिली निविदा २६ मे रोजी प्रसिद्ध केली. तिची मुदत सात दिवसांची होती. त्यात एकही ठेकेदार आला नाही.
- श्रावण हर्डीकर, आयुक्त