देहूत बीज सोहळ्यासाठी प्रशासनाची धावपळ, विविध कामे सुरू
By ऑनलाइन लोकमत | Published: March 19, 2019 02:33 AM2019-03-19T02:33:00+5:302019-03-19T02:33:57+5:30
अवघ्या चार दिवसांवर आलेल्या श्री संत तुकाराममहाराज बीजोत्सवाच्या निमित्ताने ग्रामपंचायत प्रशासनाच्या वतीने कामाची लगबग सुरू झाली आहे.
देहूगाव : अवघ्या चार दिवसांवर आलेल्या श्री संत तुकाराममहाराज बीजोत्सवाच्या निमित्ताने ग्रामपंचायत प्रशासनाच्या वतीने कामाची लगबग सुरू झाली आहे.
शुक्रवारी (दि. २२) श्री संत तुकाराममहाराज बीजोत्सव म्हणजेच तुकाराम बीजसोहळा होत आहे. या पार्श्वभूमीवर नुकतीच प्रशासनाने आढावा बैठक घेतली होती. बैठकीनंतर खऱ्या अर्थाने यात्रा तयारीला प्रशासनाकडून सुरुवात झाली आहे.
पिंपरी -चिंचवड महापालिका व ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांनी देहूगावासह आळंदी रस्त्यावरील पथदिव्यांची दुरुस्ती केली. देहूगाव कमानीला लावण्यात आलेल्या दिव्यांचीही दुरुस्ती करण्यात आली. सध्या गावात ड्रेनेज लाइनचे काम अंतिम टप्प्यात असून, विठ्ठलनगरची ड्रेनेज लाइन गावातील मुख्य लाइनला जोडण्याचे काम वेगाने सुरू आहे. ही ड्रेनेज लाईन मुख्य वाहिनीला जोडण्याचे काम बीजेपूर्वी संपविण्याच्या दृष्टीने रात्रंदिवस प्रयत्न सुरू आहेत, तर पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने देहू-आळंदी रस्त्याचे काम सुरू असून, ते समतल करून मजबूत करण्याचे काम सुरू आहे. यात्रेपूर्वी या रस्त्याचे डांबरीकरण करण्याच्या दृष्टीने काम वेगात सुरू आहे.
दरम्यान जगद्गुरू श्री संत तुकाराममहाराज यांच्या बीजोत्सव सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर येणाºया भाविकांच्या सोयीसुविधा आणि सुरक्षितता, विविध कामांचे नियोजन याचा आढावा घेण्यासाठी प्रांताधिकारी सचिन बारवकर यांच्या अध्यक्षतेखाली विविध शासकीय अधिकाऱ्यांची आढावा बैठक नुकतीच झाली. विविध कामांची तयारी व परिसराची पाहणी करण्यात आली. या वेळी शासकीय अधिकाºयांनी परिसराची पाहणी केली. येत्या बुधवारी (दि.२०) पुन्हा आढावा बैैठक घेण्यात येणार आहे. या वेळी कामाचा आढावा घेण्यात येईल.
आरोग्याची काळजी : डीडीटीची फवारणी
ग्रामपंचायतीच्या वतीने नालेसफाईला सुरुवात केली आहे. अंतर्गत रस्त्यांवरील विद्युत दिव्यांची दुरुस्ती करण्याचे कामही सुरू आहे. गटारांची साफसफाई करून त्यावर डीडीटी पावडर फवारण्यात येणार असल्याची माहिती ग्रामविकास अधिकारी अर्जुन गुडसुरकर यांनी सांगितले.
यात्रेसाठी १९ तारखेपासून पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात येणार आहे. यामध्ये साध्या गणवेशातील पोलीस, गुन्हे अन्वेषण विभागातील पोलीस गस्तीवर असणार असून वाहतूक नियंत्रक पोलीस वेगळे असल्याचे पोलीस निरीक्षक धस यांनी सांगितले.श्री संत तुकाराममहाराज संस्थानाचे विश्वस्त अभिजीत मोरे यांनी वैकुंठस्थान मंदिर परिसरात सुरक्षितता ठेवण्याचे, तसेच वैकुंठस्थान परिसरात पालखी प्रदक्षिणेसाठी रस्ता तयार करण्याची मागणी आढावा बैठकीत करण्यात आली होती.