खिळेमुक्त झाडे करण्यासाठी प्रशासनाचा कारवाईचा बडगा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 29, 2018 08:14 PM2018-05-29T20:14:58+5:302018-05-29T20:14:58+5:30
कुठेही झाडांवर जाहिरात किंवा बॅनर लावण्यासाठी खिळे ठोकताना दिसला तर त्यावर त्वरीत कारवाई करण्यात येणार आहे.
रावेत : खिळेमुक्त झाडे ह्या अभियानात प्राधिकरण आघाडीवर आहे. गेले ११ आठवडे ही मोहीम या परिसरात राबवली जात आहे. आयुक्तांनी झाडावर खिळे ठोकून जाहिरात बाजी करणाऱ्यांवर कारवाईचे आदेश दिल्यानंतर प्रशासनाकडून कारवाईसाठी पाऊले उचलली जात आहेत. 'अ' प्रभागाचे सहायक आरोग्य अधिकारी एम.एम. शिंदे आणि आरोग्य निरीक्षक बापूसाहेब गायकवाड यांनी झाडांवर खिळे आणि बॅनर लावल्याबद्दल शहर विद्रुपीकरण आणि अस्वच्छता या नियमानुसार जाहिरात करणाऱ्या दुकानदारांवर प्रत्येकी २०० रुपये दंड आकारत कारवाई केली. यापूढील काळात जास्तीत जास्त दंड आकारण्यात येईल असेही सुनाविण्यात आले.
कुठेही झाडांवर जाहिरात किंवा बॅनर लावण्यासाठी खिळे ठोकताना दिसला तर त्यावर त्वरीत कारवाई करण्यात येईल आणि नागरिकांनी सुद्धा झाडांवर असलेल्या जाहिरातींचे फोटो काढून प्रभागामध्ये दयावेत. काही दुकानदारांना आणि नागरिकांना समज देण्यात आली. सामाजिक संस्थांनी राबवलेल्या खिळेमुक्त झाडे या उपक्रमाअंतर्गत सर्व झाडांना प्रथम खिळेमुक्त करून त्यानंतर त्यांचा कोंडलेला श्वास मोकळा करण्यासाठी त्यांच्या भोवती आळे करण्यात येते. आगामी काळात ही कारवाई आणखी तीव्र करण्यात येणार असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.