बापरे..., ‘PG’ पर्यंतच्या फीमध्ये ‘KG' ला ॲडमिशन! पालक झाले हैराण
By ऑनलाइन लोकमत | Published: July 8, 2022 12:39 PM2022-07-08T12:39:29+5:302022-07-08T12:39:36+5:30
केजीच्या प्रवेशालाही भरावे लागतात किमान १८ ते २० हजार
पिंपरी : आम्ही सरकारच्या जिल्हा परिषद व नगरपालिकांच्या शाळेत शिकलो. नोकरी मिळेपर्यंत पदव्युत्तर (पीजी) शिक्षण घेतले. त्यावेळी जेवढे शैक्षणिक शुल्क द्यावे लागले नाही, तेवढे आता आपल्या मुलांना इंग्रजी माध्यमाच्या शाळेत प्रवेश घ्यायचा म्हणजे किमान १८ ते २० हजार आणि तेवढेच डिपॉझिट भरावे लागत आहे. त्यामुळे पालक हैराण झाले आहेत.
आपण मराठी शाळेत शिकलो, पण आपली मुले आता इंग्रजीतून शिकली पाहिजेत, असा पालकांचा अट्टाहास आहे. त्यामुळे सुशिक्षितांपासून ते हातावर पोट असलेल्या पालकांचीही तोच अट्टाहास आहे. प्ले ग्रुपमध्ये मुलांना वयाच्या साडेतीन वर्षापासून ॲडमिशन घेतले जात आहे. मात्र, केजी आणि प्ले ग्रुपची फी ऐकून पालक हैराण झाले आहेत. आपल्या पोस्ट ग्रॅज्युएशनपेक्षा (पीजी) मुलाची केजीची फी जास्त आहे, असे म्हणण्याची वेळ पालकांवर आली आहे. कारण प्ले ग्रुप आणि केजीसाठी कमीत १८ ते २० हजार रुपये पालकांना जवळ ठेवावे लागत आहेत.
विद्यार्थ्यांना केजीसाठी ॲडमिशन घेताना साधारण २० हजार रुपये डेव्हलपमेंट फी म्हणून आकारली जात आहे. शिवाय ॲडमिशन फी म्हणून पाच ते सहा हजार रुपये आकारले जातात. असे एकत्र २५ ते २६ हजार रुपये पालकांना भरावे लागतात. त्यानंतर वार्षिक फी २४ हजार रुपये आकारले जात आहेत. त्यामुळे पालकांचे एकूण ५० हजार रुपयांपर्यंत खर्च येत आहे. शिवाय प्रत्येक भागातील शाळेनुसार हे शुल्क कमी-जास्तसुद्धा होत आहे. डेव्हलपमेंट फी एकाचवेळी तर, वार्षिक फी महिन्याला हप्त्याच्या स्वरुपात किंवा सहा महिन्यांनी दोन हप्त्यात भरण्याचे शाळांकडून पालकांना सांगितले जात आहे.
सर्वसामान्यांचाही इंग्रजी शाळांचा अट्टाहास...
पूर्वी आणि आतादेखील सरकारी महाविद्यालयांमधून अवघ्या दोन ते सात हजार रुपयांमध्ये पदव्युत्तर पदवीचे शिक्षण पूर्ण होते. मात्र, उच्च शिक्षण इतक्या कमी पैशांमध्ये होत असताना केजीसाठी भरमसाठी फी आकारली जात आहे. विशेष म्हणजे मध्यम वर्गीय पालकांच्या मुलांमध्ये आपले मूल या स्पर्धेच्या युगात मागे राहू नये, म्हणून मोलमजुरी करणारे पालकसुद्धा ही फी देण्यास तयार होत आहेत.
अवघे चार तास शिक्षण
केजीसाठी हजारो रुपये फी आकारणाऱ्या शाळा अवघ्या दोन ते चार तास मुलांना शाळेत बसवत आहेत. यामध्ये मुलांना स्टँडिंग लाईन, स्लिपिंग लाईन, अक्षरओळख, कविता शिकवत आहेत.