प्रश्नपत्रिकेची झेरॉक्स दिल्याचे कबूल केले; मात्र पेपर फुटल्याचे मान्य केले नाही, सेट समन्वयकांना विद्यार्थ्यांचा घेराव
By ज्ञानेश्वर भंडारे | Published: January 10, 2024 06:56 PM2024-01-10T18:56:52+5:302024-01-10T18:57:23+5:30
प्रश्नप्रत्रिका सीलबंद न देता झेरॉक्स कॉपी देण्यात आल्याने विद्यार्थी बहिष्कार टाकत परीक्षा केंद्रातून बाहेर पडले
पिंपरी : संशोधन अधिछात्रवृत्ती (पीएच.डी. फेलोशीप) मिळविण्यासाठी बुधवारी (दि. १०) परीक्षा घेण्यात आली होती. मात्र, प्रश्नप्रत्रिका सीलबंद न देता झेरॉक्स कॉपी देण्यात आल्याने विद्यार्थी बहिष्कार टाकत परीक्षा केंद्रातून बाहेर पडले. त्यानंतर सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे सेट विभागाचे समन्वयक डॉ. बी. पी. कापडणीस यांनी प्रश्नपत्रिकेची झेरॉक्स दिल्याचे कबूल केले, मात्र, पेपर फुटल्याचे मान्य केले नाही, त्यामुळे विद्यार्थ्यांनी त्यांना घेराव घालत घोषणा दिल्या.
सारथी, बार्टी आणि महाज्योती यांच्यातर्फे देण्यात येणाऱ्या संशोधन अधिछात्रवृत्तीसाठी पात्रता परीक्षा २४ डिसेंबरला घेण्यात आली होती. विद्यापीठाच्या ‘सेट’ विभागावर प्रश्नपत्रिका तयार करण्याची जबाबदारी होती. मात्र, ही प्रश्नपत्रिका ‘सेट-२०१९’च्या प्रश्नपत्रिकेची जशीच्या तशी कॉपी असल्याचे आढळले. त्यावर विद्यार्थ्यांनी आक्षेप घेत परीक्षा रद्द करण्याची मागणी केली होती. त्यामुळे बुधवारी परीक्षा घेण्यात आली, मात्र पुन्हा प्रश्नपत्रिकेची झेरॉक्स दिल्याने विद्यार्थ्यांनी परीक्षा दिलीच नाही.
सेट विभागाने स्वत:चीच सूचना पाळली नाही
परीक्षेदरम्यान विद्यार्थ्यांना सी आणि डी या दोन सेटमध्ये सील नसलेले आणि झेरॉक्स असलेले प्रश्नसंच वितरित करण्यात आले. विशेष म्हणजे प्रश्नसंचामध्ये सील नसलेल्या प्रश्नपत्रिका स्वीकारू नयेत, अशा स्पष्ट सूचना आहेत. त्यामुळे विद्यार्थीही संभ्रमात पडले. त्यांनी ही बाब परीक्षा समन्वयकांच्या निदर्शनास आणून दिली. मात्र, त्यांनी परीक्षा देण्यास विद्यार्थ्यांना प्रवृत्त केले. याआधी झालेल्या परीक्षेत २०१९ ची प्रश्नपत्रिका आल्याने गोंधळ उडाला होता. आता पुन्हा तोच प्रकार घडल्याने विद्यार्थ्यांनी जोरदार घोषणाबाजी केली. ‘आम्हाला सरसकट फेलोशिप द्या’, अशी मागणीही केली.
कापडणीस यांनी शब्द फिरवले
सेट विभागाचे समन्वयक डॉ. बी. पी. कापडणीस यांना विद्यार्थ्यांनी घेराव घातला. त्यांनी सीलबंद प्रश्नपत्रिका दिल्या नसल्याचे कबूल केले. आपल्यावर दबाव होता त्यामुळे परीक्षा घेतल्याचे सांगितले. मात्र, त्यानंतर केबिनमध्ये गेल्यानंतर त्यांनी स्वत:चे शब्द फिरवत पेपर सीलबंद असल्याचे तसेच पेपरफुटीचा प्रकार घडला नसल्याचे जाहीर प्रकटन काढले.
सुरक्षारक्षकांची धक्काबुक्की
डॉ. कापडणीस यांनी आंदोलक विद्यार्थ्यांना परीक्षा रद्द करतो, असे तोंडी सांगितले होते. मात्र, त्यांनी लेखी उत्तर दुसरेच दिले. त्यामुळे विद्यार्थ्यांनी घोषणा देत त्यांच्या केबिनकडे धाव घेतली. तेथील सुरक्षारक्षकांनी विद्यार्थ्यांना धक्काबुक्की केली. पोलिसांनी मध्यस्थी केल्याने प्रकरण थंडावले.
कुलगुरू मुंबईत तर कुलसचिव पळाले
सकाळी दहा साडेदहाला हा प्रकार घडला. त्यानंतर साडेबाराच्या दरम्यान विद्यार्थ्यांनी विद्यापीठातील सेट भवनात डॉ. बी. पी. कापडणीस यांना घेराव घातल्याचे कळताच कुलसचिव विजय खरे यांनी विद्यापीठातून काढता पाय घेतला. कुलगुरू सुरेश गोसावी बैठकीसाठी मुंबईत असल्याचे सांगण्यात आले.