जामिनासाठी बनावट कागदपत्रे बनविणारा वकील अटकेत
By ऑनलाइन लोकमत | Published: November 13, 2019 01:19 PM2019-11-13T13:19:48+5:302019-11-13T13:22:04+5:30
रोझरी एज्युकेशन ग्रुप फसवणूक प्रकरणात अटकपूर्व जामिनासाठी बनावट प्रतिज्ञापत्र..
पुणे : रोझरी एज्युकेशन ग्रुप फसवणूक प्रकरणात अटकपूर्व जामिनासाठी बनावट प्रतिज्ञापत्र तयार करणाऱ्या वकिलाला शिवाजीनगर पोलिसांनी अटक केली आहे़. तसेच बनावट प्रतिज्ञापत्र तयार करण्यासाठी मदत करणाऱ्या दोघा वकिलां विरोधातही गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सागर मारुती ऊर्फ राजाभाऊ सूर्यवंशी (वय ४०, रा. कोरेगाव पार्क) असे त्याचे नाव आहे़ शिमंतिनी कुलकर्णी आणि रशीद डी. सय्यद आणि त्यांना मदत करणाऱ्या विरोधातही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी विनय विवेक आरान्हा (वय ४४, रा. कॅम्प) शिवाजीनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती़.
सूर्यवंशी यांच्यासह इतर तीन जणांवर रोझरी एज्युकेशन ग्रुप प्रकरणात शिवाजीनगर पोलिस ठाण्यात ३० जून २०१८ मध्ये फसवणूकीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता़. या गुन्ह्यात सूर्यवंशी याने अटकपूर्व जामिन मिळावा यासाठी ८ फेब्रुवारी २०१९ मध्ये अर्ज दाखल केला होता. यासोबत त्यांचे वकिल शिमंतिनी कुलकर्णी यांनी प्रतिज्ञापत्र जोडले होते. न्यायालयीन कामकाजा दरम्यान फिर्यादी आरान्हा यांना सूर्यवंशी यांचे प्रतिज्ञापत्र मिळाले असता त्यांच्या लक्षात आले की, प्रतिज्ञापत्रावरील सही बनावट आहे. फिर्यादी यांनी आपल्या वकिलामार्फत ही गोष्ट न्यायालयाची निदर्शनास आणून दिली. शिवाजीनगर पोलिसांनी प्रतिज्ञापत्रावर सूर्यवंशी याची बनावट सही असल्याचे न्यायालयात सांगितले. तसेच हे बनावट प्रतिज्ञापत्र तयार करण्यासाठी नोटरी रशिद डी. सय्यद यांनी मदत केल्याचे सांगत जामिन अर्ज फेटाळण्याची मागणी केली होती.