मूलभूत सुविधांपासून वंचित राजमाची, स्वातंत्र मिळून ७० वर्षांनंतरही प्रश्न ‘जैसे थे’च
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 1, 2018 03:13 AM2018-02-01T03:13:46+5:302018-02-01T03:13:54+5:30
पर्यटननगरी अशी ओळख असलेल्या लोणावळा व खंडाळा या शहरापासून अवघ्या २० किमी अंतरावर राजमाची किल्ल्याच्या पायथ्याला वसलेल्या राजमाची हे गाव देशाच्या स्वातंत्र्याला ७० वर्षे पूर्ण होत असताना आजही पिण्याचे पाणी, रस्ते व वीज या मूलभूत सुविधांपासून वंचित राहिलेले आहेत. शासनाची उदासीनता व स्थानिक नेत्यांचा पाठपुराव्याचा अभाव ह्या गोष्टी गावाच्या दुर्लक्षितपणामुळे अधोरेखित होत आहे.
लोणावळा : पर्यटननगरी अशी ओळख असलेल्या लोणावळा व खंडाळा या शहरापासून अवघ्या २० किमी अंतरावर राजमाची किल्ल्याच्या पायथ्याला वसलेल्या राजमाची हे गाव देशाच्या स्वातंत्र्याला ७० वर्षे पूर्ण होत असताना आजही पिण्याचे पाणी, रस्ते व वीज या मूलभूत सुविधांपासून वंचित राहिलेले आहेत. शासनाची उदासीनता व स्थानिक नेत्यांचा पाठपुराव्याचा अभाव ह्या गोष्टी गावाच्या दुर्लक्षितपणामुळे अधोरेखित होत आहे.
स्वराज्याचे टेहाळणी किल्ले अशी ओळख असलेल्या राजमाची येथील श्रीवर्धन व मनोरंजन या दोन किल्ल्यांच्या पायथ्याला राजमाची हे दोनशे ते सव्वादोनशे नागरीवस्ती असलेले गाव आहे. गावात २३ घरे आहेत़ तर शेजारी असलेल्या वळवंडे गावात सात ते आठ घरे व फणसराई येथे पंधरा ते वीस आदिवासी लोकांच्या झोपड्या आहेत. राजमाची किल्ला हा ट्रेकर व पर्यटक यांचे आकर्षण असल्याने वर्षभर याठिकाणी पर्यटकांची वर्दळ असते. तोच येथील नागरिकांचा रोजगाराचा मार्ग असल्याने आलेल्या पर्यटकांची घरगुती पद्धतीने राहण्याची व जेवणाची सोय करत दोन पैसे हे ग्रामस्थ कमवितात. रस्त्याअभावी होणारी गैरसोय टाळण्याकरिता मावळचे आमदार संजय भेगडे यांच्या निधीमधून या गावाला जाणाºया कच्च्या दगडी व माताड रस्त्यावर चार मोठे पूल व तीन साकव पूल बांधण्यात आले आहेत.
गाव अंधारातच : अद्यापपर्यंत वीज पोहोचली नाही]
मागील काळात पंचायत समितीच्या माध्यमातून गावाला सौरदिवे देण्यात आले होते. सह्याद्रीच्या पर्वत रांगेत बेसाल्ट पद्धतीचा दगड असल्याने या भागात विहिरीला अथवा बोरिंगला देखील पाणी लागत नसल्याने नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागते. गावाच्या खालील बाजूला असलेल्या एका तळ्यातून अथवा किल्ल्यावर असलेल्या खळग्यांमधून नागरिकांना पिण्याचे पाणी आणावे लागते. गावामध्ये सात सदस्य असलेली ग्रामपंचायत आहे. मात्र ग्रामपंचायतीला गावातील नागरिकांचा मिळणारा कर वगळता कसलेही उत्पन्न नसल्याने गावात कोणतीही विकासाची कामे झालेली नाहीत. गावात आर्थिक वर्षाच्या पहिल्या दिवशी शंभर टक्के कर वसुली केली जाते. तंटामुक्त गाव, पर्यावरणपूरक गाव असे अनेक पुरस्कार या गावाने मिळविले आहेत. या परिसरात वन विभाग रस्ता करण्यास मान्यता देत नसल्याने येथे अद्याप पक्के रस्ते झालेले नाहीत. शहरापासून २० किमी अंतरावर हे गाव असूनही येथे अद्याप वीज पोहोचलेली नाही. आजही गावात तेलाचे किंवा रॉकेलचे दिवे लावले जातात.
रस्ता बनविण्यात आडकाठी नसावी
वन विभागाच्या आडमुठेपणामुळे राजमाची गावाचा रस्ता व पर्यायाने विकास रखडलेला आहे. राजमाची गावाला रस्ता झाल्यास त्याच्या मागोमाग या परिसराचा विकास झाल्याशिवाय राहणार नाही. मात्र या ठिकाणी रस्ता झाल्यास स्थानिकांच्या पर्यटन व्यवसायावर गदा येईल, अशी येथील काही नागरिकांची धारणा असल्याने गावातील काही मंडळींचा देखील रस्ता होण्यास विरोध आहे.
या दुहेरी पेचाचा त्रास मात्र निष्पाप ग्रामस्थांना भोगावा लागतो आहे. गावात कोणी आजारी पडले अथवा काही घटना घडल्यास मोठी समस्या निर्माण होते. पावसाळ्यात तर या गावात गाडी जाऊ शकत नसल्याने नागरिकांना चार महिन्यांचा किराणा घरात भरावा लागतो. कोणी आजारी पडल्यास झोळी करुन त्याला लोणावळ्यात घेऊन यावे लागते़ गावाच्या या समस्याचा विचार करता राजमाची गावाचा रस्ता होण्यास किमान कोणी आडकाठी करू नये अशी भावना परिसरातील नागरिक व्यक्त करत आहेत.