अखेर शिक्षिका गजाआड, बालक मारहाणप्रकरण, एक दिवसाची पोलीस कोठडी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 15, 2017 03:14 AM2017-09-15T03:14:14+5:302017-09-15T03:14:46+5:30
पिंपळे गुरव येथील भावनगरमध्ये राहणाºया देव कश्यप या अडीच वर्षांच्या बालकाला शिक्षिकेने लाकडी पट्टीने मारहाण केली. डोळे सुजेपर्यंत मारहाण करणाºया या शिक्षिकेविरुद्ध सांगवी पोलिसांनी गुरुवारी गुन्हा दाखल केला आहे. अटक करून न्यायालयात दाखल केले असता, तिला एक दिवसाची पोलीस कोठडी देण्यात आली आहे.
पिंपरी : पिंपळे गुरव येथील भावनगरमध्ये राहणाºया देव कश्यप या अडीच वर्षांच्या बालकाला शिक्षिकेने लाकडी पट्टीने मारहाण केली. डोळे सुजेपर्यंत मारहाण करणाºया या शिक्षिकेविरुद्ध सांगवी पोलिसांनी गुरुवारी गुन्हा दाखल केला आहे. अटक करून न्यायालयात दाखल केले असता, तिला एक दिवसाची पोलीस कोठडी देण्यात आली आहे. भाग्यश्री पिल्ले असे शिक्षिकेचे नाव आहे. शहरात या घटनेचे तीव्र पडसाद उमटले असून, नागरिकांनी संतप्त प्रतिक्रिया नोंदविल्या आहेत.
अमृता कॉलनी, विल्यमनगर, पिंपळे गुरव येथे भाग्यश्री पिल्ले ही महिला खासगी शिकवणी वर्ग घेते. आर्थिक परिस्थिती बेताची असूनही कश्यप कुटुंबीयांनी मुलाला इंग्रजी शिक्षण देण्याचा ध्यास बाळगला आहे. घराजवळ काही अंतरावर असलेल्या शिकवणी वर्गात ते मुलाला पाठवत होते. या बालकाला शिक्षिकेने बेदम मारहाण केली. बालकाचा चेहरा, डोळे सुजले. त्या वेळी वडील संतोष कश्यप, आई लक्ष्मी कश्यप यांनी पिंपळे गुरव पोलीस चौकीत धाव घेतली. तेथे त्यांना सांगवी पोलिसांकडे जाण्याचा सल्ला देण्यात आला. ते सांगवी पोलीस ठाण्यात गेले असता, संबंधित शिक्षिकेविरु द्ध फिर्याद दाखल करण्यासाठी अगोदर वैद्यकीय तपासणी करून या, त्यानंतर पुढील कार्यवाही करू, असे सांगितले.
औंध येथील शासकीय रु ग्णालयात जाऊन तपासणी करण्यास सांगण्यात आले. मात्र, पालकांना त्यासाठी धावाधाव करणे शक्य नव्हते. अखेर मजूर दांपत्य बालकाला घेऊन घरी गेले, ते परत पोलिसांकडे फिरकले नाही. त्यामुळे त्यांची काही तक्रार नाही, असे समजून पुढील कार्यवाही झाली नसल्याचे स्पष्टीकरण पोलिसांनी बुधवारी दिले होते. मात्र, या प्रकरणाचा गाजावाजा झाल्यानंतर गुरुवारी मात्र पोलिसांनी तक्रार दाखल करून घेतली. त्यामुळे भारतीय दंडसंंहिता ३२४, बाल न्याय अधिनियम २०१५ नुसार सांगवी पोलिसांनी शिक्षिकेविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पोलीस उपनिरीक्षक ए. बी. शेटे अधिक तपास करीत आहेत.
पोलिसांची भूमिका संशयास्पद
तीन दिवसांपूर्वी, सोमवारी बालकाला मारहाण होण्याची घटना घडली. बुधवारी हा प्रकार उघडकीस आला. त्या वेळी महिलेला औंध रुग्णालयात वैद्यकीय तपासणीसाठी जायला सांगितले. तेथून महिला परत पोलिसांकडे आली नाही. त्यामुळे फिर्याद दाखल करण्याची कारवाई होऊ शकली नाही, अशी सबब सांगणाºया पोलिसांनी गुरुवारी दुसरेच कारण पुढे केले. शिक्षिका बालकाचा रुग्णालयाचा खर्च करण्यास तयार असल्याने फिर्याद दाखल करण्याबाबत पालकांची द्विधा मन:स्थिती होती. त्यामुळे फिर्याद दाखल होण्यास विलंब झाल्याचे स्पष्टीकरण पोलिसांनी दिले. पोलिसांची ही भूमिका संशयास्पद असल्याचे बोलले जात आहे.