पिंपरी महापालिका क्षेत्रातील आनंदनगरनंतर आता भाटनगरातही धोका; दिवसभरात २६ रूग्णांची भर
By ऑनलाइन लोकमत | Published: May 27, 2020 08:17 PM2020-05-27T20:17:36+5:302020-05-27T20:19:43+5:30
खराळवाडी झोपडपट्टीनंतर आनंदनगर आणि आता भाटनगर झोपडपट्टी परिसरात कोरोनाचा शिरकाव
पिंपरी : महापालिका क्षेत्रात कोरोनाचा प्रादूर्भाव वाढल्याने रूग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. दाटवस्ती आणि झोपटपट्यांतही कोरोना शिरला आहे. फिजिकल डिस्टंन्सिंग पालन होत नसल्याने रूपीनगर, खराळवाडी, आनंदनगरनंतर कोरोना भाटनगरमध्ये कोरोनाचा धोका वाढला आहे. दिवसभरात २६ रूग्णांची भर पडली असून रूग्णांची संख्या ४४६ वर पोहोचली आहे.
पुण्यात रूग्ण आढळल्यानंतर त्यांच्या 'हाय रिस्क कॉनट्क्ट' मध्ये आलेल्यांना आठ मार्चला रूग्णालयात दाखल केले होते. त्याचे रिपोर्ट १० मार्चला आले होते. एकाच दिवशी तीन रूग्ण आढळले होते. मार्च आणि एप्रिलमध्ये लॉकडाऊनचे पालन कडकपणे होत असल्याने रूग्णांची संख्या नियंत्रित होती. मात्र, २२ मे रोजी शहराला रेडझोनमधून वगळले आहे. जनजीवन पुर्वपदावर आणण्याचा भाग म्हणून दुकाने सुरु करण्यासाठी महापालिकेने परवानगी दिली. परंतु, निर्बंध शिथिल करताच रुग्ण संख्येत झपाट्याने वाढत आहेत. सुरूवातीला दाट लोकवस्तीत असणारा कोरोना वेगाने वाढत आहे.
खराळवाडी झोपडपट्टीनंतर आनंदनगर आणि आता भाटनगर झोपडपट्टी परिसरात कोरोनाचा शिरकाव झाला आहे. त्यामुळे या भागालगत असणारी बाजारपेठ बंद केली आहे. बुधवारी शहरात २६ रूग्ण आढळले असून शहरातील रुग्ण संख्या ४४६ वर पोहचली आहे. २२० सक्रिय रुग्णांवर उपचार सुरु आहेत. शहरातील २८ रुग्णांवर महापालिका हद्दीबाहेरील तर महापालिका हद्दीबाहेरील ३५ रुग्णांवर महापालिका रुग्णालयात उपचार सुरु आहेत. तर आजपर्यंत १९१ जण कोरोनामुक्त झाले असून पुण्यातील दहा आणि पिंपरी-चिंचवडमधील सात जणांचा मृत्यू झाला आहे. सुरुवातीला हौसिंग सोसायटीत आढळणारा कोरोना, मध्यमवर्गीय वसाहतीतून आता झोपडपट्टीत शिरला आहे.
२०९ जणांचे अहवाल प्रलंबित
महापालिकेच्या रूग्णालयात ८३ जणांना दाखल केले आहे. त्यामुळे एकुण दाखल रूग्णांची संख्या ४६४ झाली आहे. तर आज २६ जणांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले असून ६२ रूग्णांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत. ६६ जणांना आज डिस्चार्ज दिला आहे. आज पॉझिटिव्ह आलेल्यांमध्ये शहरातील १२ पुरूष, १० महिला आणि पुण्यातील चार पुरूषांचा समावेश आहे. त्यामध्ये चºहोली, भाटनगर, किवळे, निगडी, पिंपळेगुरव, सांगवी, आनंदनगर, चिंचवड, बौद्धनगर, काळेवाडी फाटा, बोपखेल, आंबेगाव या भागातील नागरिकांचा समावेश आहे. तर २१ जण कोरोनामुक्त झाले आहेत. त्यांना डिस्चार्ज दिला आहे. त्यात किवळे, रूपीनगर, आनंदनगर, संभाजीनगर, चिंचवड, रहाटणी, चिखली, कसबा पेठ, बोपोडी या भागातील नागरिकांचा समावेश आहे.