औरंगाबाद, अहमदनगरनंतर आता पिंपरी-चिंचवडचे नाव जिजाऊनगर? शहरात १००हून अधिक फ्लेक्स

By ज्ञानेश्वर भंडारे | Published: June 5, 2023 03:17 PM2023-06-05T15:17:35+5:302023-06-05T15:18:19+5:30

औरंगाबाद आणि नगरचे नामांतर सरकार करू शकते तर मग पिंपरी-चिंचवडचे का नाही? असा सवाल

After Aurangabad, Ahmednagar now Pimpri-Chinchwad name Jijaungar? More than 100 Flex in the city | औरंगाबाद, अहमदनगरनंतर आता पिंपरी-चिंचवडचे नाव जिजाऊनगर? शहरात १००हून अधिक फ्लेक्स

औरंगाबाद, अहमदनगरनंतर आता पिंपरी-चिंचवडचे नाव जिजाऊनगर? शहरात १००हून अधिक फ्लेक्स

googlenewsNext

पिंपरी : औरंगाबाद आणि अहमदनगरचे नामांतर करण्यात आल्यानंतर आता पिंपरी-चिंचवडच्या नामांतराच्या मागणीने जोर धरला आहे. पिंपरी चिंचवडमधील संस्थेनेच ही नामांतराची मागणी केली आहे. औरंगाबाद आणि नगरचे नामांतर सरकार करू शकते तर मग पिंपरी-चिंचवडचे का नाही? असा सवाल या संघटनेने केला आहे. शहरात जवळपास १०० हून अधिक ठिकाणी पिंपरी-चिंचवडचा जिजाऊ नगर हे नाव करण्याची मागणी करणारे फ्लेक्स लावण्यात आले आहेत. या फ्लेक्समुळे शहरात चर्चेला उधाण आले आहे.

राज्यातील विविध शहरांची नावे बदलण्यावरून मोठा राजकीय वाद सध्या राज्यात होताना दिसत आहे. त्याचदरम्यान गेल्या काही दिवसांपासून पिंपरी-चिंचवड शहराचे नावही बदलण्याची मागणी जोर धरताना दिसत आहे. तर भक्ती शक्ती प्रतिष्ठानकडून पिंपरी-चिंचवड शहराचे नाव बदलण्याची मागणी करण्यात आली आहे. शहराच्या विविध भागात फ्लेक्स लावत भक्ती शक्ती प्रतिष्ठानने ही मागणी केली आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या ३५० व्या राज्याभिषेक दिनाचे औचित्य साधत ही मागणी केली आहे. त्यामुळे पिंपरी चिंचवडच्या नामांतराचा निर्णय सरकार घेणार का? याकडे सर्वांच लक्ष लागले आहे. ऐन विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर आणखी एका नामांतराच्या मागणीची भर पडली आहे.

नगरचं नामकरण

दरम्यान, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्ताने चौंडी येथे कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी संबोधित केले. यावेळी त्यांनी अहमदनगरचं नामकरण अहिल्यादेवी नगर करण्याची घोषणा केली. नगरचे नामकरण अहिल्यादेवी नगर करण्याची येथील नागरिकांची गेल्या अनेक वर्षापासूनची मागणी होती. गोपीचंद पडळकर, आमदार राम शिंदे आदी नेत्यांनी ही मागणी लावून धरली होती. धनगर समाजातील इतर नेत्यांनी आणि संस्था, संघटनांनीही ही मागणी लावून धरली होती. अखेर ही मागणी मान्य करण्यात आली आहे. लवकरच या नामकरणाबाबतचे सर्व सोपस्कार पार पडून नगरचे नाव अहिल्यादेवी होळकर करण्यात येणार आहे.

औरंगाबादचं नामकरण

या आधी उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना औरंगाबादचे नामकरण छत्रपती संभाजीनगर असे करण्यात आले होते. मात्र, त्या कॅबिनेटचा निर्णय अवैध असल्याचे सांगत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी औरंगाबादचे पुन्हा छत्रपती संभाजी नगर करण्याचा प्रस्ताव मंजूर करून घेतला होता. त्यानंतर हे प्रकरणही कोर्टात गेले होते.

Web Title: After Aurangabad, Ahmednagar now Pimpri-Chinchwad name Jijaungar? More than 100 Flex in the city

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.