जामिनावर बाहेर आल्यानंतर फुलांची उधळण, फटाक्यांची आतिषबाजी; निगडी पोलिसांनी काढली धिंड
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 18, 2025 09:19 IST2025-02-18T09:19:41+5:302025-02-18T09:19:56+5:30
पोलिसांनी खून प्रकरणातील संशयिताचे स्वागत करणार्यांची धिंड काढल्याने नागरिकांमधून समाधान व्यक्त होत आहे

जामिनावर बाहेर आल्यानंतर फुलांची उधळण, फटाक्यांची आतिषबाजी; निगडी पोलिसांनी काढली धिंड
पिंपरी : खून प्रकरणातील एका संशयिताची सात वर्षांनी जामिनावर सुटका झाली. तो निगडी येथील घरी आल्यावर फुलांची उधळण आणि फटाक्यांची आतिषबाजी करीत त्याचे जोरदार स्वागत करण्यात आले. ही बाब निदर्शनास येताच निगडीपोलिसांनी २४ तासांच्या आत त्याच ठिकाणी संशयितांची धिंड काढली.
शाम यत्नाळकर (रा. त्रिवेणीनगर, तळवडे, निगडी) असे जामिनावर सुटका झालेल्याचे नाव आहे. सातारा येथील एका खून प्रकरणात तो संशयित आहे. तो गेली सात वर्ष तुरूंगात होता. नुकताच त्याला जामीन मंजूर झाल्यावर तो त्रिवेणीनगर येथील घरी आला. त्यावेळी त्याच्या साथीदारांनी त्याच्यावर फुलांची उधळण केली. तसेच फटाके वाजवून त्याचे स्वागत केले. खून प्रकरणातील संशयिताचे जंगी स्वागत पाहून परिसरातील नागरिकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले.
याबाबतची माहिती मिळताच निगडी पोलिस संशयिताच्या घरी गेले. मात्र जंगी स्वागतानंतर कोणते नवीन संकट यायला नको म्हणून संशयिताने तिथून पळ काढला. पोलिसांनी त्याच्या नातेवाइकांच्या माध्यमातून त्याच्याशी संपर्क साधून त्याला निगडी पोलिस ठाण्यात आणले. तसेच स्वागतासाठी कोण-कोण होते याचीही माहिती घेतली. त्यानुसार मुख्य संशयितासह त्याचे स्वागत करणार्या अन्य चार जणांनाही ताब्यात घेतले. ज्या ठिकाणी खुनातील संशयिताचे स्वागत झाले त्याठिकाणी पोलिसांनी संशयितांची धिंड काढली.
रिल्स टाकल्यानंतर ‘सोशल मीडिया’वर माफिनामा
गेल्या आठवड्यात कुख्यात गुंड सोन्या काळभोर आणि रावण टोळीच्या नावाने सोशल मीडियावर अकाऊंट तयार करून त्यावर रिल्स टाकणार्या तीन जणांना निगडी पोलिसांनी अटक केली होती. त्याच्याकडून सोशल मीडियाच्या त्याच पेजवर माफीनामा टाकण्यास भाग पाडले. या प्रकरणाची जोरदार चर्चा पिंपरी-चिंचवड शहरात सुरू होती. त्यानंतर खून प्रकरणातील संशयिताचे स्वागत करणार्यांची धिंड काढल्याने नागरिकांमधून समाधान व्यक्त होत आहे.
‘‘खुनासारख्या गुन्ह्यातील संशयिताचे जंगी स्वागत करणे म्हणजे समाजात गुन्हेगारी प्रवृत्तीला प्रोत्साहन देण्यासारखे आहे. पोलिसांनी हे गांभीर्य ओळखून तातडीने कारवाई केली. अशा प्रकारांना वेळीच आळा घालण्यासाठी आम्ही कठोर भूमिका घेतली आहे. भविष्यात अशा प्रकारच्या गुन्हेगारी वृत्तीचे प्रदर्शन होत असेल, तर आम्ही तितक्याच कठोर कारवाईसाठी तयार आहोत.’’ - शत्रुघ्न माळी, वरिष्ठ पोलिस निरीक्षक, निगडी पोलिस ठाणे.