भूमिपूजनानंतर मंडईची फक्त मंडईच
By admin | Published: May 12, 2017 05:12 AM2017-05-12T05:12:06+5:302017-05-12T05:12:06+5:30
भोईरनगरमधील रस्त्यावर भरत असलेल्या भाजी मंडईचे नवीन जागेत स्थलांतर केव्हा होणार असा सवाल आता नागरिक
लोकमत न्यूज नेटवर्क
चिंचवड : भोईरनगरमधील रस्त्यावर भरत असलेल्या भाजी मंडईचे नवीन जागेत स्थलांतर केव्हा होणार असा सवाल आता नागरिक व भाजी विक्रेते विचारत आहेत. निवडणुकीपूर्वी नवीन भाजी मंडई च्या जागेचे भूमिपूजन झाले. या ठिकाणी पन्नास गाळे तयार होणार असल्याचे जाहीर केले. मात्र याचे काम अद्यापही सुरू झाले नसल्याने प्रशासनाच्या अनियोजित कारभाराबाबत नागरिक संताप व्यक्त करीत आहेत.
अनेक वर्षांपासून चिंचवडमधील भोईरनगर चौकातील रस्त्यावर भाजी मंडई भरते. यामुळे या भागात वाहतूककोंडी ही गंभीर समस्या झाली आहे. येथील भाजी विक्रेत्यांचा प्रश्न सोडविण्यासाठी पालिका प्रशासनाने बाजूला असलेल्या मोकळ्या जागेत नवीन मंडई तयार करण्याचा निर्णय घेतला. दाट लोकवस्ती असलेल्या या परिसरात रस्त्यावर भाजी मंडई भरत असल्याने वाहतुकीचा प्रश्न गंभीर झाला आहे. परिसरात शाळा असल्याने या चौकात विद्यार्थ्यांची नेहमीच वर्दळ असते. येथील वाहतुकीचा सामना विद्यार्थी व पादचाऱ्यांना करावा लागतो. नवीन भाजी मंडईसाठी बाजूला असलेल्या मोकळ्या जागेत पत्राशेड उभारणार असल्याचे जाहीर केले होते.