तक्रारीनंतर पिंपरी-चिंचवड सहशहर अभियंता अयुबखान पठाण यांची उचलबांगडी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 9, 2018 12:17 PM2018-02-09T12:17:16+5:302018-02-09T12:17:57+5:30
तक्रारी आल्याने सहशहर अभियंता अयुबखान पठाण यांची बदली केली आहे. त्यांच्याकडे आता केवळ पर्यावरण अभियांत्रिकी विभागाचे कामकाज सोपविले आहे.
पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिका परिसरातील अतिक्रमणाला कारणीभूत असल्याच्या तक्रारी आल्याने आणि एकाच विभागात ठिय्या मांडून बसलेल्या बांधकाम परवानगी व अवैध बांधकाम नियंत्रण विभागात ठाण मांडून बसणाऱ्या सहशहर अभियंता अयुबखान पठाण यांची बदली केली आहे. त्यांच्याकडे आता केवळ पर्यावरण अभियांत्रिकी विभागाचे कामकाज सोपविले आहे.
नवी सांगवी, पिंपळे गुरव परिसरातील भाजपा नेत्यांच्या व्यावसायिक अवैध बांधकामांना प्रशासनाचे पाठबळ असल्याचा आरोप राष्ट्रवादीचे माजी नगरसेवक राजेंद्र जगताप यांनी केला. त्यानंतर महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी सहशहर अभियंत्यांना चांगलेच फैलावर घेतले. अयुबखान पठाण यांच्याकडून खुलासा मागविला. अवैध व्यावसायिक बांधकामांना जबाबदार असलेल्या उपअभियंता, बीट निरीक्षकांची नावे मागविली. जे दोषी आढळतील त्यांच्यावर कडक कारवाई करण्याचा इशारा आयुक्तांनी दिला. त्यामुळे पठाण आयुक्तांच्या रडारवर आले.
दरम्यान, एकाच जागेवर असलेल्या पठाण यांच्याविषयी 'राजकीय आशीवार्दाने एकाच विभागात' असे वृत्त लोकमतने प्रकाशित केले होते. निवृत्तीआधी चौकशीचा ससेमिरा नको, अशी विनवणी केल्यावर आयुक्तांनी शिक्षेचे स्वरूप बदलले. त्यानुसार सहशहर अभियंत्यांच्या कामकाजात फेरबदल केले आहेत.
बांधकाम विभागातच होते ठाण मांडून
बांधकाम परवानगी व अवैध बांधकाम नियंत्रण विभाग महापालिका कामकाजात सर्वांत महत्त्वाचा आहे. या विभागातून बांधकाम परवाना दिला जातो. या विभागातून यापूर्वी केवळ परवाना देण्याचे काम चालायचे. मात्र, तत्कालीन आयुक्त डॉ. श्रीकर परदेशी यांनी बांधकाम परवानगी विभागाला अवैध बांधकाम विभागही जोडला. जबाबदारी निश्चित केली. त्यामुळे शहरातील अवैध बांधकामाला हाच विभाग कारणीभूत असल्याचा आक्षेप आहे. महापालिकेत २४ मार्च १९८१ मध्ये अयुबखान पठाण कनिष्ठ अभियंता पदावर रुजू झाले. त्यानंतर १९८६ ते ९५ या काळात त्यांनी बांधकाम विभागात उपअभियंता या पदावर काम केले. त्यानंतर त्यांची दोन वर्षे दुसºया विभागात बदली झाली. १९९७ ला ते पुन्हा बांधकाम विभागात आले. २००० मध्ये त्यांची बांधकाम विभागातून बदली झाली. त्यानंतर त्यांनी पाणीपुरवठा विभागात उपअभियंता म्हणून तसेच जलनि:सारण विभागाचे कार्यकारी अभियंता म्हणून कामकाज पाहिले. २०१३ मध्ये ते पुन्हा बांधकाम विभागात आले. २०१३ पासून आजपर्यंत तेथेच कार्यरत असून त्यांच्याकडे सध्या सहशहर अभियंता पद आहे. तब्बल १६ वर्षे त्यांनी बांधकाम विभागात काम केले आहे. सप्टेंबर २०१८ मध्ये ते निवृत्त होणार आहेत.