पिंपरी-चिंचवड विकास प्राधिकरणाच्या अध्यक्षपदी सदाशिव खाडे : चौदा वर्षांनी मिळाला अध्यक्ष
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 31, 2018 09:23 PM2018-08-31T21:23:22+5:302018-08-31T21:23:31+5:30
पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाच्या अध्यक्षपदी भारतीय जनता पक्षाचे माजी अध्यक्ष आणि स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांचे समर्थक सदाशिव खाडे यांची निवड झाली आहे.
पिंपरी : पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाच्या अध्यक्षपदी भारतीय जनता पक्षाचे माजी अध्यक्ष आणि स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांचे समर्थक सदाशिव खाडे यांची निवड झाली आहे. चौदा वर्षांनी प्राधिकरणाला अध्यक्ष मिळाला आहे. प्राधिकरण अध्यक्षपदासाठी मुंडेगटाची सरशी झाली आहे.
पिंपरी-चिंचवड औद्योगिकनगरीत पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाच्या निर्मितीपासून ४६ वर्षांपैकी निम्याहून अधिक कालावधीत प्रशासकीय राज होते. याचे प्रमुख कारण म्हणजे
राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसने दुसरे सत्ताकेंद्र होऊ नये, म्हणून दक्षता घेतली होती. शालेय शिक्षणमंत्री प्रा. रामकृष्ण मोरे असताना त्यांनी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्या मदतीने २००१ मध्ये समिती नियुक्त केली होती. अध्यक्षपदी काँग्रेसचे अध्यक्ष बाबासाहेब तापकीर यांची निवड झाली होती. त्यानंतर २००४ ला समितीचा कार्यकाल संपुष्टात आल्यानंतर गेली चौदा वर्षे प्राधिकरणावर लोकनियुक्त समिती नियुक्त झाली नव्हती.
भाजपची सत्ता आल्यानंतर पिंपरी-चिंचवड मधील भाजपा कार्यकर्त्यांनी समितीवर निष्टावानांना संधी द्यावी, अशी मागणी केली होती. अध्यक्षपदी जुण्यांना की नव्यांना संधी यावरून पिंपरी-चिंचवडच्या भाजपाच्या नेत्यांमध्ये एकमत होत नव्हते. या पदावर गोपीनाथ मुंडे, नितीन गडकरी, रावसाहेब दानवे यांच्या समर्थकांनी दावा केला होता. अध्यक्षपदासाठी मुंडेचे निष्ठावान कार्यकर्ते सदाशिव खाडे यांच्या नावाची शिफारस महिला आणि बालकल्याण मंत्री पंकजा मुंडे यांनी केली होती. याबाबतचे वृत्त लोकमतने प्रसिद्ध केले होते. खाडे यांच्या नावाची कुणकुण लागल्याने भाजपातील स्थानिक नेत्यांनी आपापल्या समर्थकांची नावे लावून धरली होती. मात्र, ऐनवेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महामंडळे आणि प्राधिकरणाच्या अध्यक्षांच्या निवडी जाहिर केल्या. त्यात खाडे यांना संधी मिळाली आहे.