पत्नीनंतर सास-याचा खून, तपासात झाले स्पष्ट, आरोपीस सापळा रचून उत्तर प्रदेशात अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 20, 2017 02:57 AM2017-10-20T02:57:17+5:302017-10-20T02:57:29+5:30
पिंपरी येथील एमआयडीसी कारखान्यात काम करणा-याने पत्नीची हत्या करून तिचा मृतदेह भोसरीतील एका नाल्यात फेकला. त्यानंतर उत्तर प्रदेशात जाऊन सास-याचाही खून केल्याचा प्रकार चौकशीतून उजेडात आला
पिंपरी : येथील एमआयडीसी कारखान्यात काम करणा-याने पत्नीची हत्या करून तिचा मृतदेह भोसरीतील एका नाल्यात फेकला. त्यानंतर उत्तर प्रदेशात जाऊन सास-याचाही खून केल्याचा प्रकार चौकशीतून उजेडात आला आहे. पिंपरी पोलिसांनी सापळा रचून उत्तर प्रदेशातून विनोद जैस्वार (वय ३०) या आरोपीला अटक केली आहे.
भोसरीतील एका नाल्यामध्ये अनोळखी महिलेचा मृतदेह पोत्यात बांधून टाकल्याचे १ आॅक्टोबरला आढळले होते. पाच दिवसांपूर्वी या महिलेच्या मृतदेहाची ओळख पटली. त्यानंतर गुन्हाच्या तपासाला वेग आला.
घरातील सततच्या भांडणांना कंटाळून पतीने या महिलेच्या डोक्यात लोखंडी रॉड घालून तिचा खून केला होता. पत्नीचा मृतदेह पोत्यात भरून तो त्याने भावाच्या मदतीने मगर स्टेडिअममागील नाल्यात टाकला होता. पत्नीच्या हत्येनंतर आपल्या लहान मुलाला घेऊन जैस्वार उत्तर प्रदेशला रवाना झाला होता. मुलाला बहिणीकडे सोपवून त्याने थेट बायकोचे माहेर गाठले. तेथे सासरे खजानसिंग मुन्नर गौतम (वय ७०) यांच्या डोक्यात घाव घालून त्यांनाही ठार मारले.
महिलेच्या मृतदेहाची ओळख पटल्यानंतर पिंपरी पोलिसांनी कसून तपास सुरू केला. त्यानंतर पोलिसांनी उत्तर प्रदेश व इतर ठिकाणी
विनोदच्या मागावर पथके पाठविली होती. त्या वेळी विनोद राजन जैसवार याला भेटण्यासाठी येणार असल्याची माहिती मिळाली. त्यावर सापळा रचून त्याला पिंपरी पोलिसांनी ताब्यात घेऊन अटक केली.
अप्पर पोलीस आयुक्त शशिकांत शिंदे, पोलीस उपायुक्त गणेश शिंदे, सहायक पोलीस आयुक्त राम मांडुरके, वरिष्ठ पोलीस निरीक्षक विवेक मुंगळीकर व पोलीस निरीक्षक (गुन्हे) मसाजी काळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांच्या पथकाने ही कारवाई केली.