पुण्यानंतर आता हिंजवडी परिसरात रानगव्याचा 'गवगवा' ; नववर्षाच्या पहिल्याच दिवशी दिले दर्शन
By ऑनलाइन लोकमत | Published: January 1, 2021 11:04 AM2021-01-01T11:04:13+5:302021-01-01T11:38:56+5:30
गेल्या महिनाभरात दोनदा दिले होते.
पुणे: गेल्या महिनाभरात कोथरूड व बाणेर अशा दोन ठिकाणी रानगव्याने दर्शन दिले होते. त्यानंतर नववर्षाच्या पहिल्याच दिवशी आज हिंजवडी परिसरातील माणगाव येथे एका शेतकरी कुटुंबाला रानगवा दिसला आहे. रानगव्याच्या दर्शनाने मात्र परिसरात एकच गोंधळ उडाला आहे.
नववर्षाच्या पहिल्याच दिवशी आयटीनगरीतील माणमध्ये गव्याचे दर्शन झाले. पहाटे साडेपाचच्या सुमारास येथील राक्षेवस्ती येथे हा रानगवा आढळून आला. पांडुरंग राक्षे म्हणाले, पहाटेच्या सुमारास कामाला असणाऱ्या गड्याने गोठयातील बैल सोडून बाहेर बांधले, त्यांना चारा घेऊन तो आला असता गवा बैलांशेजारी गवा उभा असल्याचे त्याने पहिले. सुरवातीला धुक्यामुळं आम्हाला समजलं नाही मात्र मॉर्निंग वॉक करुन परतलेल्या जयवंत राक्षे यांनी गवा असल्याचे ओळखताच आम्ही घरात धाव घेतली. आरडा ओरडा झाल्याने गवा नदीच्या दिशेने शांत पणे निघून गेला असं पांडुरंग राक्षे यांनी सांगितले.
दरम्यान, खाण्या पिण्याचा ओढीने अथवा इतर जनावरांची चाहूल लागल्याने तो नदीकडून राक्षे वस्तीकडे आला असावा असा अंदाज ग्रामस्थ व्यक्त करत असून नववर्षाच्या सुरवातीलाच माणमध्ये रानगवा आल्याची बातमी परिसरात वाऱ्यासारखी पसरल्याने बघ्यांची मोठी गर्दी झाली आहे. तसेच गव्यामुळे परिसरात दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
कोथरूडमध्ये आलेल्या रानगव्याने सोडला होता प्राण..
पुणे शहरातील कोथरूड उपनगरातील महात्मा सोसायटीत रानगवा आला असल्याचे तेथील रहिवाशांनी कळवले होते. बुधवार आज पहाटे फिरण्यासाठी घराबाहेर पडलेल्या नागरिकांना रानगवा दिसताच एकच धांदल उडाली होती. तब्बल तीन तासांच्या प्रयत्नानंतर रानगवा कोथरूडमधील पौड रस्त्यावरील भारतीनगर सोसायटी ऋतुगंध बंगला परिसरात वनविभागाच्या जाळ्यात अडकला होता. त्यानंतर भुलीच्या इंजेक्शनमुळे तो बेशुध्द पडला. त्यानंतर, वन विभागाने त्यास गाडीतून नेले, पण काही वेळातच त्याने आपला जीव सोडला.
दुसऱ्या घटनेत बावधन येथील एचसीएमआरएल पाषाण तलावालगत असलेल्या भिंतीजवळ पुन्हा एकदा गवा आढळून आला होता. पाच तास उलटून गेल्यानंतर हे अद्याप गव्याला पकडण्यामध्ये वन विभागाला यश आले नव्हते.
रेस्क्यू टीमला देखील गव्याला त्याच्या नैसर्गिक अधिवासामध्ये सोडण्यासाठी प्रयत्न कसोशीने प्रयत्न केले होते. त्यानंतर तो नैसर्गिक अधिवासामध्ये सुखरूप परतला होता.