अहवाल वाचनानंतर दोषींवर कारवाई करणार
By admin | Published: June 1, 2017 02:02 AM2017-06-01T02:02:38+5:302017-06-01T02:02:38+5:30
गॅस शवदाहिनी घोटाळ्यासंदर्भात त्रिसदस्यीय चौकशी समितीने तयार केलेला अहवाल स्थायी समिती पदाधिकाऱ्यांना पाहिला मिळाला
लोकमत न्यूज नेटवर्क
पिंपरी : गॅस शवदाहिनी घोटाळ्यासंदर्भात त्रिसदस्यीय चौकशी समितीने तयार केलेला अहवाल स्थायी समिती पदाधिकाऱ्यांना पाहिला मिळाला. चौकशी अहवालाचे सविस्तर वाचन केल्यानंतरच दोषींवर उचित कारवाई करू, अशी स्पष्टोक्ती आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी दिली.
सांगवी येथील स्मशानभूमीत पर्यावरणपूरक गॅस शवदाहिनी बसविण्यात आली आहे. या कामाबाबत तक्रारी आल्या आहेत. त्यावर आर्थिक व तांत्रिक सल्ला देण्यासाठी पुणे शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयातील (सीओईपी) तज्ज्ञांची नेमणूक करण्याचा आणि त्यांना आगाऊ १ लाख ३६ हजार ८०० रुपये देण्याचा प्रस्ताव विषय पत्रिकेवर होता. या प्रस्तावास सभापती सीमा सावळे, नगरसदस्या आशा शेंडगे यांनी विरोध केला.
त्या म्हणाल्या, सांगवीतील स्मशानभूमीबाबत आपण तक्रार केली होती. तत्कालीन आयुक्त दिनेश वाघमारे यांनी या तक्रारींची दखल घेत त्रिसदस्यीय चौकशी समिती नेमली होती. त्यात सहआयुक्त दिलीप गावडे, मुख्य लेखापाल राजेश लांडे आणि सहशहर अभियंता आयुबखान पठाण यांचा समावेश होता. या समितीने २२ नोव्हेंबर २०१६ रोजी अहवाल सादर केला होता. त्यातील निष्कर्षाच्या अनुषंगाने त्रयस्थ संस्थेमार्फत तांत्रिक सल्ला घेण्याचे तत्कालीन आयुक्तांनी ठरविले. तंत्रज्ञान व दराबाबत खात्री करण्यासाठी २८ लाख १७ हजारांचा खर्च येईल, असे मुंबईतील आयआयटीने कळविले. हे शुल्क वाजवी वाटत नसल्याने आयुक्त हर्डीकर यांनी सीओईपीकडे विचारणा केली. प्रा. बी. जी. बिराजदार व प्रा. एस. एन. सपाली यांनी सहमती दर्शविली. १ लाख ३६ हजार ८०० रुपये सल्लागार शुल्क आकारू,असे सांगितले.