एकानं केला बलात्कार; दुसऱ्याकडून शरीरसुखाची मागणी, नकार दिल्यानं महिलेचा खून
By ऑनलाइन लोकमत | Published: September 20, 2021 02:21 PM2021-09-20T14:21:49+5:302021-09-20T20:18:12+5:30
एकाला अटक : तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात दोघांवर गुन्हा दाखल
पिंपरी : दोन जणांनी महिलेला दर्शनासाठी घोरावडेश्वर डोंगरावर नेले. तेथे एकाने महिलेवर बलात्कार केला. त्यानंतर दुसऱ्याने तिच्याकडे शरीरसुखाची मागणी केली. मात्र, महिलेने त्याला नकार दिल्याने त्याने ओढणीच्या सहाय्याने गळा दाबून तिचा खून केला. तसेच तोंडावर दगडाने मारून मृतदेह झाडीत टाकला. पुणे - मुंबई महामार्गावर देहूरोड नजिकच्या घोरावडेश्वर डोंगरावर सोमवारी (दि. २०) सकाळी हा प्रकार उघडकीस आला.
तुकाराम कोंडीबा दडस (वय २६, रा. थॉमस कॉलनी, देहूरोड, मूळ रा. टाकेवाडी, पोस्ट तोंडले, ता. माण, जि. सातारा) आणि अक्षय कारंडे (रा. लोणंद, सातारा), अशी आरोपींची नावेत आहेत. आरोपी दडस याला पोलिसांनीअटक केली. पीडित १९ वर्षीय मयत महिलेच्या पतीने या प्रकरणी तळेगाव - दाभाडे पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.
पोलिस निरीक्षक शहाजी पवार यांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी तुकाराम दडस व अक्षय कारंडे हे दोघेही एकमेकांचे मित्र आहेत. मयत महिला ही गृहिणी होती. तर तिचा पती मजुरीची कामे करतो. तसेच आरोपीही मजुरीची कामे करतात. मयत महिलेचे एका वर्षपूर्वी लग्न झाले होते.
आरोपींनी पीडित महिलेला रविवारी (दि. १९) सकाळी दहाच्या सुमारास दर्शनासाठी घोरावडेश्वर डोंगरावर नेले. तेथे गेल्यावर आरोपी अक्षय याने महिलेवर बलात्कार केला. त्यानंतर आरोपी तुकाराम दडस याने पीडित महिलेकडे शरीर सुखाची मागणी केली. मात्र, तिने नकार दिला. त्यामुळे चिडलेल्या आरोपी तुकाराम दडस याने ओढणीच्या सहाय्याने गळा दाबून तिचा खून केला. तसेच ओळख पटू नये म्हणून तोंडावर दगडाने मारून मृतदेह झाडीत टाकला. पोलिसांनी आरोपी तुकाराम दडस याला अटक केली असून आरोपी अक्षय कारंडे फरार आहे.