पंच्चाहत्तर दिवसांनंतर सर्वपक्षीय समिती ढिम्म, प्रश्न अद्याप ‘जैसे-थे’च
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 5, 2017 04:10 AM2017-11-05T04:10:12+5:302017-11-05T04:10:46+5:30
रिंगरोड बाधितांच्या समस्या सोडविण्यासाठी सर्वपक्षीय समिती नेमण्यात आली़ त्या समितीला ७५ दिवस पूर्ण झाले आहेत़ तरीही समितीने प्रश्न सोडविण्यासाठी कोणात्याही प्रकारची हालचाल केली नाही़ त्यामुळे नाराजी व्यक्त होत आहे.
रावेत : रिंगरोड बाधितांच्या समस्या सोडविण्यासाठी सर्वपक्षीय समिती नेमण्यात आली़ त्या समितीला ७५ दिवस पूर्ण झाले आहेत़ तरीही समितीने प्रश्न सोडविण्यासाठी कोणात्याही प्रकारची हालचाल केली नाही़ त्यामुळे नाराजी व्यक्त होत आहे.
‘रिंगरोड आंदोलन’ तीव्र होत चालले आहे. कालबाह्य रिंगरोडमुळे हजारो कुटुंबीय बेघर होणार आहेत, अशा गुरुद्वारा रोड, बिजलीनगर, चिंचवडेनगर, थेरगाव, पिंपळे गुरव, कासारवाडी येथील बाधित राहिवाशांनी आंदोलनाचे शस्त्र उपसले आहे. गेल्या १४० दिवसांपासून सदरचे आंदोलन विविध उपक्रमांनी सुरूच आहे. हा चिघळलेला प्रश्न सोडविण्याकरिता महापालिकेच्या सर्वसाधारण सभेमध्ये दिनांक १९ आॅगस्टला सर्वपक्षीय ‘अवलोकन समितीची’ स्थापना करण्यात आली. ही समिती मुख्यमंत्र्यांना भेटून रिंगरोड बाधितांचा प्रश्न सोडविण्याकरिता प्रयत्न करणार आहे. परंतु ७५ दिवस लोटूनही कोणतेही काम सदरच्या समितीने केलेले नाही.
रेखा भोळे म्हणाल्या,‘‘गेल्या ७५ दिवसांत अवलोकन समितीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची तत्काळ भेट घेणे आवश्यक होते. सत्य परिस्थिती त्यांना सांगितल्यास ते योग्य तोडगा काढतील.’’
समन्वयक योगेश विरोळे म्हणाले, ‘‘थेरगाव या मध्यवर्ती उपनगरांचा विकास हा पहिल्यापासूनच प्राधिकरणाच्या दुर्लक्षामुळे वंचित आहे. येथील राहवासी ‘एचसीएमटीआर’ रोड प्रकल्पाची टांगती तलवार गेल्या ३५ वर्षांपासून डोक्यावर घेऊन जगत आहे. या सर्व राहिवाशांची नोंद होणे आवश्यक आहे़ ह्यांना प्रॉपर्टी कार्ड प्रशासनाने देणे आवश्यक आहे. त्यानंतर पुढील कार्यवाही सुरू करावी.’’