पुण्यातील पत्रकार प्रसाद गोसावींच्या मृत्यूनंतर ५ रुग्णांना जीवदान; लष्करी जवानाला मिळाले हृदय

By नारायण बडगुजर | Published: September 2, 2024 04:28 PM2024-09-02T16:28:44+5:302024-09-02T16:29:54+5:30

प्रसाद यांच्या हृदयाबरोबरच दोन फुफ्फुसे (लंग्स), यकृत (लिव्हर), एक मूत्रपिंड (किडनी) व दोन डोळे या अवयवांचेही दान केले

After the death of journalist Prasad Gosavi in Pune 5 patients were given life A military man got a heart | पुण्यातील पत्रकार प्रसाद गोसावींच्या मृत्यूनंतर ५ रुग्णांना जीवदान; लष्करी जवानाला मिळाले हृदय

पुण्यातील पत्रकार प्रसाद गोसावींच्या मृत्यूनंतर ५ रुग्णांना जीवदान; लष्करी जवानाला मिळाले हृदय

पिंपरी : पुणे शहरातील पोलिसनामा न्यूज पोर्टलचे वरिष्ठ पत्रकार प्रसाद गजानन गोसावी यांचे रविवारी (दि. १) निधन झाले. सव्वा महिन्यांपूर्वी गंभीर अपघात झाल्यामुळे त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू होते. मृत्यूवर मात करतील असे वाटत असतानाच प्रसाद यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यानंतर प्रसाद यांचे अवयव दान करण्यात आले. प्रसाद हे अवयवदान करणारे पहिले पत्रकार ठरले आहेत. एवढेच नाही तर मृत्यूनंतर काही तासांतच त्यांच्या हृदयाचे एका लष्करी जवानाच्या शरीरात यशस्वीपणे प्रत्यारोपण झाले. प्रसाद यांची मृत्युसोबत केलेली झुंज अपयशी ठरली असली तरीही आजही त्याचे हृदय धडधडते आहे. हृदयाबरोबरच दोन फुफ्फुसे (लंग्स), यकृत (लिव्हर), एक मूत्रपिंड (किडनी) व दोन डोळे या अवयवांचेही दान केले. त्यामुळे पाच रुग्णांना नवीन जीवन मिळाले. 

प्रसाद गोसावी यांच्या दुचाकीला सव्वा महिन्यापूर्वी कामावरून घरी येत असताना खडकी रेल्वे स्थानकाजवळ गंभीर अपघात झाला होता. त्यांच्यावर निगडीच्या खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. अपघातात त्यांच्या मेंदूला आणि पायाला गंभीर दुखापत झाली होती. त्यांचा जीव वाचवण्याचे आव्हान डॉक्टरांच्या पुढे होते. पायाच्या संवेदना नाहीशा झाल्यामुळे त्यांचा उजवा पाय पोटरीपासून काढण्याचा निर्णय घ्यावा लागला. त्यानंतर त्यांची प्रकृती सुधारत असतानाच अचानक मेंदूत रक्तस्त्राव झाल्यामुळे त्यांची शुद्ध हरपली. डॉक्टरांनी प्रयत्नांची पराकाष्ठा केली पण प्रकृतीत सुधारणा होत नव्हती. अखेर डॉक्टरांनी प्रसाद ब्रेनडेड झाल्याचे घोषित केले. त्यामुळे प्रसादच्या कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला. पण या परिस्थितीत डगमगून न जाता त्यांनी प्रसादचे अवयव दान करण्याचा निर्णय घेतला. प्रसादचे डोळे, हृदय, दोन फुप्फुसे, यकृत, एक किडनी हे अवयव दान केले.

प्रसाद यांचे हृदय नेण्यासाठी पिंपरीपासून पुण्यापर्यंत ग्रीन कॉरिडॉर केला होता. पोलिस व लष्करी जवानांच्या संरक्षणात त्यांचे हृदय पुण्याच्या दिशेने रवाना झाले. त्यावेळी डी. वाय. पाटील रुग्णालयातील डॉक्टर व कर्मचाऱ्यांनी प्रसादला सलामी दिली. एवढेच नाही तर त्यांच्या मृत्यूनंतर काही तासातच त्यांचे हृदय पुण्याच्या सदर्न कमांड हॉस्पिटलमध्ये एका जवानावर हृदयरोपण शस्त्रक्रिया यशस्वीपणे करण्यात आली. अवयवदानानंतर त्यांचा मृतदेह नातेवाइकांच्या ताब्यात दिला. निगडीच्या स्मशानभूमीत अंत्यसंस्कार झाले. 

प्रसाद या जगात नसले तरीही त्यांचे हृदय अजूनही धडधडत आहे. भविष्यात एखाद्याला त्यांच्या डोळ्यांनी हे जग पाहता येणार आहे. यकृत, फुप्फुसे व किडनी मिळाल्यामुळे संबंधित रुग्णांना नवीन जीवन मिळाले. आपल्या मृत्यूनंतर अवयवदान करणारा पहिला पत्रकार म्हणून प्रसाद गोसावी कायमस्वरूपी लक्षात राहतील, अशी भावना नातेवाईकांनी व्यक्त केली.

Web Title: After the death of journalist Prasad Gosavi in Pune 5 patients were given life A military man got a heart

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.