PCMC | चार महिने महापालिका निवडणूक लांबणीवर, इच्छुक थंडावले
By ऑनलाइन लोकमत | Published: December 13, 2022 09:25 PM2022-12-13T21:25:13+5:302022-12-13T21:30:01+5:30
गुडघ्याला बाशिंग बाधून तयार असणाऱ्यांची गोची...
पिंपरी : महापालिका निवडणुकीबाबत सर्वोच्च न्यायालयात सुरू असलेली सुनावणी महिनाभर लांबणीवर पडली आहे. जानेवारीत सुनावणी होणार आहे. राज्य शासनाने दिलेल्या आदेशानुसार निवडणूक प्रशासनाने २०१७ नुसार निवडणुकीबाबत सज्जता ठेवली आहे. त्यामुळे फेब्रुवारीत होणारी निवडणूक एप्रिल-मे महिन्यात होण्याची शक्यता आहे. त्यामुळे गुडघ्याला बाशिंग बाधून तयार असणाऱ्यांची गोची झाली आहे.
पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकीचा गोंधळ गेले वर्षेभर सुरू आहे. प्रभाग रचनेत झालेला विलंब, ओबीसी आरक्षणाचा गोंधळ, चार, दोन आणि तीन असा प्रभाग रचनेचा गोंधळ यामुळे महापालिकेत प्रशासकीय राजवट सुरू करण्यात आली. त्यामुळे १४ मार्चपासून प्रशासकीय राजवट सुरू आहे.
तारीख पे तारीख
ऑगस्ट महिन्यात राज्यात सत्तांतर झाल्यानंतर २०१७ नुसारच निवडणूक घेण्याची सूचना निवडणूक आयोगाला केली आहे. त्यानुसार याबाबतचे प्रकरण न्यायालयात प्रलंबित आहे. न्यायालयातील सुनावणी लांबणीवर पडत आहे. तर प्रत्येक वेळी राज्य सरकार नवे आदेश निवडणूक विभागास देत आहे. त्यामुळे गोंधळाची स्थिती आहे. न्यायालयाबरोबरच राज्य शासन, राज्य निवडणूक आयोगाच्या आदेशाची प्रतीक्षा केली जात आहे. निवडणुकांबाबतची सुनावणी १७ जानेवारीला होणार आहे. त्यामुळे फेब्रुवारीत अपेक्षित असणारी निवडणूक एप्रिल-मेमध्ये होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
प्रशासकीय गोंधळ
राज्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे बाळासाहेबांची शिवसेना आणि भाजपा यांचे सरकार आहे. युती सरकार चार सदस्यीय प्रभाग पद्धतीने निवडणूक घेण्यास उत्सुक आहेत. तर तीन नुसार प्रभाग रचना झाल्याने आणि आरक्षण झाल्याने न्यायालय काय निर्णय घेतेय याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. तर प्रशासन आणि राजकीय नेत्यांचाही गोंधळ झाला आहे. चार सदस्यीय प्रभाग पद्धतीने निवडणूक होणार? चार सदस्यीय प्रभाग पद्धतीने निवडणूक घ्यायची झाल्यास प्रभाग रचना, आरक्षण प्रक्रिया आणि मतदार यादी नव्याने करावी लागणार आहे. यामध्ये प्रभागातील मतदारसंख्येसह लोकसंख्यादेखील वाढेल. नव्याने प्रक्रिया करण्यासाठी दोन ते अडीच महिन्यांचा कालावधी लागणार आहे.