Positive News! पिंपरीत दोन महिन्यानंतर सक्रिय रुग्णसंख्या दहा हजाराच्या आत
By ऑनलाइन लोकमत | Published: May 23, 2021 04:13 PM2021-05-23T16:13:47+5:302021-05-23T16:13:59+5:30
२१ दिवसात घटली तेरा हजाराने रुग्ण संख्या, २२ हजारांवरून थेट ७ हजारवर
पिंपरी: दैनंदिन रुग्ण संख्येच्या तुलनेत कोरोनातून बरे होणाऱ्यांचे प्रमाण वाढले आहे. परिणामी तब्बल दोन महिन्यानंतर शहरातील सक्रिय रुग्णांची संख्या दहा हजाराच्या आत आली आहे. शहरात १९ मार्चला कोरोनाचे एकूण ९ हजार ४७८ सक्रिय रुग्ण होते. आता २२ मे च्या आकडेवारीनुसार शहरात ७ हजार ८०० सक्रिय रुग्ण आहेत. दहा हजाराच्या आत रुग्ण संख्या येण्यासाठी दोन महिन्यांचा कालावधी लागला आहे.
पिंपरी-चिंचवड शहरात फेब्रुवारी पासून रुग्ण संख्या वाढण्यास सुरुवात झाली. सक्रिय रुग्ण संख्या ही १९ मार्चपर्यँत दहा हजाराच्या आत होती. त्यानंतर दैनंदिन रुग्ण संख्या वाढल्याने सक्रिय रुग्णांची संख्या ही दिवसागणिक वाढत राहिली. परिणामी जवळपास २२ हजार पर्यँत सक्रिय रुग्ण संख्या गेली होती. एप्रिलच्या शेवटच्या आठवड्यात रुग्ण संख्या स्थिरावली. त्याचबरोबर नवीन रुग्णांच्या तुलनेत बरे होणाऱ्याचे प्रमाण वाढले.
मार्च आणि एप्रिलच्या तुलनेत मे मध्ये रुग्ण संख्या वाढीचा वेग कमी झाला. एकवीस हजारांच्या वर गेलेली सक्रिय रुग्णांची संख्या ही १५ मे ला वीस हजारांच्या आत आली. त्यानंतर मागील आठड्यापासून दैनंदिन रुग्ण संख्या ही एक हजाराच्या आत आढळून येत आहे. त्यामुळे सक्रिय रुग्णांचा आकडा दहा हजाराच्या आत आला आहे. त्यामुळे आरोग्य यंत्रणा आणि शहरातील नागरिकांना दिलासा मिळाला आहे. रुग्ण संख्या दुप्पट होण्याचा कालावधी आता ११९ दिवसांवर गेला आहे. तसेच प्रति दिन बाधित होणाऱ्यांचे प्रमाण हे ०.३५ टक्क्यांवर आले आहे.
२१ दिवसात घटली तेरा हजाराने रुग्ण संख्या
शहरात १ मे ला शहरात २१५४६ सक्रिय रुग्ण होते. त्यानंतर २१ दिवसांनी २२ मे ला ७८०० सक्रिय रुग्ण संख्या आहे. यावरून २१ दिवसात १३७४६ ने सक्रिय रुग्ण संख्या घटली आहे. यामुळे सक्रिय रुग्णांचा आकडा दहा हजाराच्या आत येण्यास मदत झाली आहे.