पावसाचे दोन महिने संपले अद्याप रेनकोट नाही : महापालिका प्रशासनाची उदासिनता
By ऑनलाइन लोकमत | Published: August 3, 2019 10:05 AM2019-08-03T10:05:45+5:302019-08-03T10:10:06+5:30
महापालिकेमार्फत गणवेश, बूट, वह्या, रेनकोट असे शालेय साहित्य देण्यात येते. मात्र, यंदा शालेय साहित्य वाटपासंबंधीची निविदा वादाच्या भोवऱ्यात सापडल्याने त्याचा फटका विद्यार्थ्यांना बसला
पिंपरी : महापालिका शाळांमधील विद्यार्थ्यांना यंदा प्रशासनाच्या ढिसाळ नियोजनामुळे शालेय साहित्य उशिराने मिळणार आहे. पावसाळा सुरू होऊन दोन महिने उलटले आहेत. जून महिन्यामध्ये शाळा सुरू झाल्यावर पहिल्या आठवड्यामध्ये विद्यार्थ्यांना रेनकोट मिळणे अपेक्षित होते. मात्र ऑगस्ट उजाडला असूनही महापालिका शाळांमध्ये रेनकोट पोहोचले नाहीत.
महापालिकेच्या शाळा सुरू होऊन दीड महिना उलटला असून, शाळेतील विद्यार्थ्यांना शासनाकडून आलेल्या पुस्तकांचे वाटप झाले आहे. मात्र, महापालिकेमार्फत मिळणारे शालेय साहित्य विद्यार्थ्यांना अद्याप मिळू शकलेले नाही. दरवर्षी शाळा सुरू होताच महापालिकेमार्फत गणवेश, बूट, वह्या, रेनकोट असे शालेय साहित्य देण्यात येते. मात्र, यंदा शालेय साहित्य वाटपासंबंधीची निविदा वादाच्या भोवऱ्यात सापडल्याने त्याचा फटका विद्यार्थ्यांना बसला आहे. ही निविदा प्रक्रिया वेळेवर उरकून विद्यार्थ्यांची सोय करणे महापालिका प्रशासनाची जबाबदारी होती. मात्र याकडे सोईस्कररित्या दुर्लक्ष करण्यात आले आहे. गेल्या दोन आठवड्यांपासून शहरामध्ये मुसळधार पाऊस सुरू आहे. विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी त्यांना रेनकोट वाटप करणे आवश्यक होते. मात्र पावसाळ्याचे दोन महिने संपले असूनही महापालिका प्रशासनाची रेनकोट वाटप संथगतीने सुरू आहे. आतापर्यंत फक्त २० शाळांमध्ये रेनकोट वाटप झाले असल्याची माहिती महापालिकेच्या शिक्षण विभागाने दिली आहे.
महापालिकेच्या शाळेत गरीब, गरजू कुटुंबातील विद्यार्थी शिक्षण घेतात. त्यामुळे त्यांना रेनकोट, बूट अशा प्रकारचे साहित्य वेळेवर मिळणे अपेक्षित असते. मात्र, प्रशासनाच्या लालफितीच्या कारभारात विद्यार्थ्यांकडे पाठ फिरवली जाते. शहरामध्ये मुसळधार पाऊस सुरू असूनही रेनकोट वाटप पूर्ण झाले नसल्याने पालकांनी संताप व्यक्त केला आहे.
.....................
१०५ पैकी फक्त २० शाळांत रेनकोट
शहरामध्ये महापालिकेच्या १०५ शाळा आहेत. आॅगस्ट महिना उजाडला असून, १०५ पैकी फक्त २० शाळांमधील विद्यार्थ्यांना रेनकोटचे वाटप करण्यात आले आहे. उरलेल्या ८५ शाळांमधील हजारो विद्यार्थी पावसामध्ये भिजत शाळेत जात आहेत. याचा विचार महापालिका प्रशासनाने गांभीयार्ने करणे आवश्यक आहे.
........................
ह्यह्यशाळांमध्ये रेनकोट वाटप सुरू आहे. कामामध्ये गती आणून वाटप त्वरित पूर्ण केले जाईल.ह्णह्ण
- ज्योत्सना शिंदे, प्रशासन अधिकारी, पिंपरी-चिंचवड महापालिका.