अघोरी कृत्य! बुवाबाजी करून विवाहितेला पाजलं कोंबडीचं रक्त
By ऑनलाइन लोकमत | Published: September 20, 2021 07:41 PM2021-09-20T19:41:34+5:302021-09-20T19:41:43+5:30
सासू - सासऱ्यासह पतीवर गुन्हा दाखल
पिंपरी : लैंगिक असक्षम असलेल्या मुलासोबत महिलेचं लग्न लावून दिलं. त्यानंतर बुवाबाजी करून महिलेला कोंबडीचे रक्त पाजलं. मी तुला मूल देऊ शकतो, असे म्हणून सासऱ्याने तिच्याशी लगट केली. पीडित विवाहितेने याप्रकरणी रविवारी (दि. १९) भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार तिचा पती, सासू आणि सासऱ्याच्या विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला. भोसरी येथे ३० डिसेंबर २०१८ ते १९ जून २०२१ या कालावधीत हा प्रकार घडला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी रत्नागिरी येथे घर बांधण्यासाठी तसेच घरखर्चासाठी विवाहितेकडे पैशांची मागणी केली. विवाहितेवर बुवाबाजी करून तिला कोंबडीचे रक्त पाजले. तुझ्या पतीला ट्रिटमेंटसाठी पैसे घालवण्यापेक्षा मी तुला मूल देऊ शकतो, असे म्हणून आरोपी सासऱ्याने विवाहितेशी लगट करण्याचा प्रयत्न केला. तिच्या मनास लज्जा उत्पन्न होईल, असे कृत्य करून तिचा विनयभंग केला.
पतीकडे इंजिनिअरिंगची डिग्री असल्याचे लग्नाच्या वेळी सांगण्यात आले होते. मात्र त्याचे डिग्रीपर्यंतचे शिक्षण झालेले नाही. पती लैंगिकदृष्ट्या सक्षम नसल्याचे माहिती असूनही सासू आणि सासऱ्याने त्याचे लग्न पीडित विवाहितेसोबत लावून फसवणूक केली. पतीच्या लैंगिक असक्षमतेबाबत विवाहितेने तिच्या आई, वडील व नातेवाईकांना सांगितले. त्या कारणावरून आरोपींनी विवाहितेला मारहाण करत शिवीगाळ व दमदाटी केली. तसेच विवाहितेचा शारीरिक व मानसिक छळ केला.
याप्रकरणी विवाहितेने पोलिसांकडे तक्रार केली. छळ करणे, स्त्री अत्याचार करणे, विनयभंग करणे यासह महाराष्ट्र नरबळी आणि इतर अमानुष अनिष्ट व अघोरी प्रथा व जादूटोणा प्रतिबंध व समुळ उच्चाटन कायदा कलम ३ नुसार पोलिसांनी गुन्हा दाखल केला. पोलीस निरीक्षक (गुन्हे) जितेंद्र कदम तपास करीत आहेत.