स्वाभिमानी घर बचाव संघर्ष चळवळीचे आकुर्डी प्राधिकरण कार्यालयावर बोंबाबोंब आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 23, 2017 01:23 PM2017-11-23T13:23:18+5:302017-11-23T13:29:02+5:30
अनधिकृत बांधकामे नियमित करण्यासाठीच्या जाचक अटी रद्द करण्याच्या मागण्यांसाठी स्वाभिमानी घर बचाव संघर्ष चळवळीने गुरूवारी (दि. २३) बोंबाबोंब आंदोलनाचा पवित्रा घेतला.
पिंपरी : चिंचवड नवनगर विकास प्राधिकरण प्रशासनाने व महापालिका प्रशासनाने अनधिकृत बांधकामे नियमित करण्यासाठी जाचक अटी व क्लिष्ट कागदपत्रांची पूर्तता करण्याची अट घातलेली आहे. तसेच जिजया कर, शास्ती कर, चालु बाजारभावानुसार भुखंडाचे मूल्य व आरक्षण, रिंगरोड बाधितांकडून हमिपत्र लिहून घेण्याचा घातलेला घाट याच्या विरोधात प्रशासानाचा निषेध म्हणून जाचक अटी रद्द करण्याच्या मागण्यांसाठी स्वाभिमानी घर बचाव संघर्ष चळवळीने गुरूवारी (दि. २३) बोंबाबोंब आंदोलनाचा पवित्रा घेतला.
अनधिकृत बांधकामधारकांची घरे नियमित करण्याच्या जाचक अटी रद्द व्हाव्यात या मागणी करिता सकाळी १० वाजता दगडोबा चौक, चिंचवडेनगरपासून बोंबाबोंब आंदोलनाची सुरूवात झाली. या मध्ये रिंगरोड बाधित नागरिकांसह प्राधिकरण हद्दीतील अनधिकृत घरे असणारे नागरिक, महिला हातात प्रशासनाच्या जाचक नियमावलीचे निषेध करणारे फलक घेऊन सहभागी झाले होते. प्राधिकरणाने नियमित करण्यासाठी घातलेल्या अटी रद्द कराव्यात, नाममात्र दंड आकारून घरे नियमित करावीत, कालबाह्य झालेला रिंगरोड रद्द करावा अशा घोषणा आंदोलनकर्ते देत होते. हे बोंबाबोंब आंदोलन आकुर्डी येथील नवनगर विकास प्रधिकरणावर धडकल्यानंतर येथे प्रशासनाच्या भूमिकेबद्दल सभा घेऊन विचार मांडण्यात आले.
स्वाभिमानी घर बचाव संघर्ष चळवळीचे समन्वयक धनाजी येळकर म्हणाले, प्राधिकरण प्रशासनाने प्रसिद्ध केलेल्या नियमावलीमध्ये अनधिकृत बाधितांचा अर्थिक सक्षमतेचा विचार न करता, कोणालाही न परवडणारा भुखंडाचा चालू बाजारभाव, विकसन शुल्क, एफ. एस. आय. पेक्षा वाढीव बांधकामाच दंड, पार्किंग नसलेल्याचा दंड, शास्तीकर पूर्ण भरल्याशिवाय नियमतीकरण्याचा अर्ज न स्वीकारणे अशा प्रकारे एक हुकमशाही नियमावली तयार करून सनदशीर मार्गाने सुरू असलेल्या आंदोलकांच्या तोंडाला पाणी पुसण्याचे काम केले आहे. म्हणून स्वाभिमानी घर बचाव संघर्ष चळवळीने या प्रशासनाचे डोके ठिकाणावर आहे का? हे विचारण्यासाठी बोंबाबोंब आंदोलनाचा मार्ग अवलंबला आहे. आंदोलनाचे नियोजन स्वाभिमानी घर बचाव संघर्ष चळवळीचे समन्वयक समन्वयक राजेंद्र देवकर, राजश्री शिरवळकर, प्रतिभा कांबळे, ज्योती वायकर, विद्या पाटील, संगीता सोनावणे, मनोहर पवार, विशाल पवार, प्रशांत सपकाळ, अमोल पाटील, शिवाजी पाटील, अतुल वर्पे, दत्ता चिंचवडे, देवेंद्र भदाणे, मनोज पाटील, सुदर्शन भराटे, जितेंद्र पाटील, सुनील पाटील, गणेश सरकटे, दत्ता गायकवाड, विजय म्हेत्रे यांनी केले आहे. या आंदोलनात अनधिकृत बांधकामग्रस्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.