केंद्र सरकारवर टीका करत पिंपरीत माकपतर्फे धरणे आंदोलन
By ऑनलाइन लोकमत | Published: December 20, 2019 07:36 PM2019-12-20T19:36:25+5:302019-12-20T19:36:31+5:30
नागरिकत्व सुधारणा कायद्यामुळे देशभरातील विद्यार्थ्यांमध्ये असंतोष निर्माण
पिंपरी : नागरिकत्व सुधारणा कायद्यामुळे देशभरातील विद्यार्थ्यांमध्ये असंतोष निर्माण झाला आहे. अमानुष दडपशाहीमुळे विद्यार्थी आणि युवाशक्ती देशभर संताप व्यक्त करीत आहे. त्याच पार्श्वभूमीवर नागरिकत्व सुधारणा कायद्याच्या विरोधात मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षातर्फे आंदोलन करण्यात आले. पिंपरी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात धरणे करण्यात आले. यावेळी केंद्र सरकारवर टीका करण्यात आली.
डॉ. सुरेश बेरी, गणेश दराडे, क्रांतिकुमार कडुलकर, सचिन देसाई, अपर्णा दराडे यांच्या नेतृत्वात आंदोलन करण्यात आले. स्वप्नील जेवळे, अविनाश लाटकर, ख्वाजा जमखाने, अनिरुद्ध चव्हाण, रंजना पवार, रंजिता लाटकर, नंदा शिंदे, शैलजा कडुलकर, शाजी, फिलिप, अनिलकुमार, पुनपन, संतोष गायकवाड आदी या आंदोलनात सहभागी झाले होते.
गणेश दराडे यावेळी म्हणाले, नागरिकत्व सुधारणा कायद्यामुळे देशभरातील विद्यार्थ्यांमध्ये असंतोष निर्माण झाला आहे. अमानुष दडपशाहीमुळे विद्यार्थी आणि युवाशक्ती देशभर संताप व्यक्त करीत आहे. भारतीय संविधानातील सात मूलभूत अधिकारांचे उल्लंघन या कायद्यामुळे होत आहे. नोटबंदीमुळे सर्व देश रांगेत उभा होता. त्यामुळे देशवासीय परेशान झाले होते. आता नागरिकत्वासाठी पुन्हा रांगेत उभे राहावे लागेल काय, अशी भीती व्यक्त केली जात आहे.
डॉ. सुरेश बेरी म्हणाले, देशात घुसखोर आहेत ते शोधण्यासाठी विद्यमान कायदे पुरेसे आहेत. एनआरसीमुळे सैन्यामधून निवृत्त झालेल्या लोकांना अभारतीय ठरवण्यात आले. आसाममध्ये अभारतीय लोकांना छळ छावणीत ठेवण्यात आले आहे. मुस्लिमद्वेषाचे राजकारण १९९२ पासून सुरू आहे. देशातील विचारवंत, युवापिढीच्या प्रतिक्रिया आणि अनेक विद्यापीठांमधील आंदोलने सरकारवरचा विश्वास उडाल्यामुळे होत आहेत.
क्रांतिकुमार कडुलकर म्हणाले, नागरिकत्व सुधारणा कायदा त्वरित मागे घेणे आवश्यक आहे. त्यासाठी या कायद्याचे विधेयक संसदीय समितीकडे व्यापक चचेर्साठी पाठवावे.