मराठा आरक्षण स्थगिती उठवण्यासाठी पिंपरीत 'संबळ बजाव'आंदोलन
By ऑनलाइन लोकमत | Published: September 15, 2020 04:37 PM2020-09-15T16:37:59+5:302020-09-15T16:40:18+5:30
पिंपरीत लोकप्रतिनिधींच्या कार्यालयासमोर संबळ वाजवून हे आंदोलन करण्यात आले.
पिंपरी : मराठा आरक्षण स्थगिती उठविण्यासाठी पिंपरी चिंचवड शहरातील मराठा सेवा संघ, संभाजी ब्रिगेड, छावा युवा मराठा महासंघ, मराठा क्रांती मोर्चा यांच्या वतीने मंगळवारी पिंपरी-चिंचवड शहरातील आमदार व खासदार यांच्या कार्यालयासमोर संबळ बजाव आंदोलन करण्यात आले.
मराठा आरक्षण स्थगिती उठविण्यासाठी पिंपरी चिंचवड शहरातील मराठा सेवा संघ, संभाजी ब्रिगेड, छावा युवा मराठा महासंघ, मराठा क्रांती मोर्चा यांच्या वतीने संबळ आंदोलनाचे नियोजन केले होते. त्यानुसार आंदोलनाची सुरुवात सकाळी ११ वाजता खासदार श्रीरंग बारणे यांच्या थेरगाव येथील कार्यालयापासून होणार आहे. बारणे यांना निवेदनही दिले.
पिंपळेगुरव येथील आमदार लक्ष्मण जगताप यांच्या कार्यालयासमोर तसेच भोसरीमधील आमदार आणि भाजप शहराध्यक्ष महेश लांडगे यांच्या कार्यालयासमोर आंदोलन केले. आंदोलनाचा शेवट पिंपरीतील आमदार अण्णा बनसोडे यांच्या चिंचवड स्टेशन येथील कार्यालयासमोर झाला.
फिजिकल डिस्टन्सचे पालन
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर फिजिल डिस्टंसीगचे नियम पाळून मोजकेच कार्यकर्ते आंदोलनात सहभागी झाले होते. शांततेच्या मार्गाने आंदोलन केले. यावेळी मराठा सेवा संघाचे प्रकाश जाधव, सामाजिक कार्यकर्ते मारुती भापकर, संभाजी ब्रिगेड पुणे जिल्हाध्यक्ष विशाल तुळवे, जिल्हा उपाध्यक्ष सतिश काळे, मराठा छावा युवा महासंघाचे अध्यक्ष धनाजी येळकर पाटील, संभाजी ब्रिगेड जिल्हा कार्याध्यक्ष गणेश दहिभाते, संघटक ज्ञानेश्वर लोभे, लहू लांडगे, रशीद सय्यद, सतीश कदम, छावा युवक संघाचे गणेश सरकटे, सागर तापकीर, अभिषेक म्हसे, दीपक जोगदंड, गणेश भांडवलकर, कृष्णा मोरे, अॅड. लक्ष्मण रानवडे यांच्या सह असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.