अहो साहेब, आम्ही कृषी पदवीधर आहोत हा आमचा गुन्हा का? उद्यान अधीक्षक पदांसाठी कृषी पदवीधारकांना डावलले

By ज्ञानेश्वर भंडारे | Published: September 8, 2022 09:15 AM2022-09-08T09:15:05+5:302022-09-08T09:15:24+5:30

महापालिकेच्या विविध विभागातील ‘ब’ आणि ‘क’ गटातील १६ पदांच्या ३८६ जागांसाठी सरळसेवेने भरतीप्रक्रिया सुरू आहे.

Agriculture graduates were left out for the posts of Park Superintendent | अहो साहेब, आम्ही कृषी पदवीधर आहोत हा आमचा गुन्हा का? उद्यान अधीक्षक पदांसाठी कृषी पदवीधारकांना डावलले

अहो साहेब, आम्ही कृषी पदवीधर आहोत हा आमचा गुन्हा का? उद्यान अधीक्षक पदांसाठी कृषी पदवीधारकांना डावलले

Next

पिंपरी :

महापालिकेच्या विविध विभागातील ‘ब’ आणि ‘क’ गटातील १६ पदांच्या ३८६ जागांसाठी सरळसेवेने भरतीप्रक्रिया सुरू आहे. मात्र, यात उद्यान अधीक्षक तसेच उद्यान विभागातील इतर पदांसाठी शैक्षणिक अर्हता ही हॉर्टिक्लचर आणि फॉरेस्ट्री या विषयाची आहे. त्यामुळे कृषी विषयांत पदवीधर असलेल्या विद्यार्थ्यांची अडचण निर्माण झाली.

भरती नियमबाह्य असल्याने कृषी पदवीधारकांचा समावेश केल्यानंतरच भरती करावी, अशी मागणी कृषी पदवीधारक विद्यार्थ्यांनी महापालिका आयुक्तांकडे केली. साधारणत: कृषी विषयांत पदवीधर असलेल्या विद्यार्थ्यांना कृषी क्षेत्रातील पदांसाठी अर्ज करता येते. तेथे अशी निवडक विषयांची अट नसते. मात्र, पिंपरी-चिंचवड महापालिकेने जाहिरातीत प्रसिद्ध केलेल्या अटीतील अजब प्रकाराने कृषी पदवीधर हैराण झाले आहेत.

पिंपरी-चिंचवड महापालिकेत सुमारे पाच हजारपेक्षा अधिक जागा रिक्त आहेत. या जागांचा अनुशेष भरून काढण्यासाठी महापालिकेने आस्थापनेवरील विविध विभागातील ‘ब’ आणि ‘क’ वर्गातील ३८६ रिक्त जागांची सरळसेवेने भरतीप्रक्रिया राबविली आहे.

नोकरभरतीची जाहिरात प्रसिद्ध झाल्यापासून आम्ही महापालिका प्रशासनाकडे पाठपुरावा करत आहोत. परंतु, आयुक्त शेखर सिंह यांच्याकडून सकारात्मक प्रतिसाद मिळत नाही. आज फॉर्म भरण्याची शेवटची तारीख आहे. मात्र, यात बदल करण्यात येत नाही. कृषी पदवीधारकांना वगळले तर ही भरती प्रक्रिया नियमबाह्य होईल. आयुक्तांनी वेळेवर निर्णय नाही घेतला तर आम्ही कोर्टाकडे दाद मागणार आहोत.
- एक कृषी पदवीधारक.

महापालिका नोकरभरतीतील उद्यान अधीक्षक व त्या विभागातील पदाच्या शैक्षणिक अर्हतेसाठी कृषी पदवीचा समावेश करावी, अशी मागणी विद्यार्थ्यांनी केली आहे. महापालिकेच्या आकृतीबंधानुसार नोकरीची जाहिरात प्रसिद्ध केली आहे. आयुक्तांकडे हा निर्णय प्रस्तावित आहे.
- बाळासाहेब खांडेकर, सहायक आयुक्त, प्रशासन विभाग.

Web Title: Agriculture graduates were left out for the posts of Park Superintendent

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.