अहमदनगरच्या डाॅक्टरला लुटण्याचा डाव उधळला, सहा जणांना ठोकल्या बेड्या
By ऑनलाइन लोकमत | Published: November 29, 2022 10:42 PM2022-11-29T22:42:48+5:302022-11-29T22:43:01+5:30
तडीपार आरोपीने साथीदारांसह मोठा डाव रचला होता.
पिंपरी : पिस्तुलाचा धाक दाखवून डाॅक्टरला लुटण्याचा कट रचला. याप्रकरणी सहा जणांना बेड्या ठोकून पोलिसांनी एका डाॅक्टरचे प्राण वाचवले. या उल्लेखनीय कामगिरीबद्दल पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी पिंपरी-चिंचवड पोलिसांच्या गुन्हे शाखेसह स्थानिक पोलिसांचे विशेष कौतुक केले.
पुनीतकुमार विवेक शेट्टी (वय २९, रा. वाकड), आफताब मेहबुब शेख (वय २१ रा. वाकड), रुपेश राजेश गायकवाड (वय २१, रा. चिंचवड), शुभम लक्ष्मण दाते (वय १९, रा. चिंचवड), सचिन बबन जायभाये (वय २४, रा. शेवगाव, अहमदनगर), साहिल हरिदास शिंदे (वय २०, रा. वाकड) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी पोलीस नाईक समीर घाडगे यांनी शिरगाव परंदवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.
तडीपार आरोपी पोलीस पुनीत शेट्टी याने साथीदारांसह मोठा डाव रचला. त्यासाठी त्याला काडतुसे पाहिजे होती. त्यामुळे काडतुसे घेण्यासाठी आरोपी साहिल शिंदे हा गहुंजे येथे येणार आहे, अशी माहिती शिरगाव पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी समीर घाडगे यांना मिळाली. त्यानुसार, शिरगाव पोलिसांनी सापळा रचला. मात्र, पोलिसांची चाहूल लागल्याने आरोपी आलेच नाहीत. त्यानंतर पोलीस आयुक्त अंकुश शिंदे यांनी तपासाचे आदेश दिले. गुंडाविरोधी पथकाने तांत्रिक तपास सुरू केला. आरोपी साहिल औरंगाबाद महामार्गाने अहमदनगरच्या दिशेने जात असल्याचे समजले. तसेच, आरोपी पुनीत शेट्टी हा धुळे जिल्ह्यात आरोपी जगन सेनानी याच्याकडे पिस्तूल नेण्यासाठी येणार असल्याचे समोर आले. त्यानुसार, धुळे आणि अहमदनगर पोलिसांशी संपर्क करून पिंपरी -चिंचवड पोलिसांनी आरोपींना ताब्यात घेतले.
आरोपींनी सुरुवातीला पोलिसांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलिसांनी खाक्या दाखवताच पुनीत शेट्टी याने कट रचल्याचे सांगितले. अहमदनगर येथील पोळ हॉस्पिटलमध्ये एक डॉक्टर असून त्याच्याकडे उपचारासाठी शहराबाहेरून मोठ्या संख्येने लोक येत असतात. त्यामुळे त्याच्याकडे भरपूर पैसे आहेत. आपण त्याला लुटल्यास खूप पैसे मिळतील, अशी माहिती आरोपी सचिन जायभाय याने अन्य आरोपींना दिली. त्यानुसार, आरोपींनी हॉस्पिटल परिसरात रेकी देखील केली. मात्र, पिंपरी -चिंचवड पोलिसांनी त्यांचा डाव उधळून लावला.
पोलीस आयुक्त अंकुश शिंदे, अपर पोलीस आयुक्त डॉ. संजय शिंदे, उपायुक्त काकासाहेब डोळे, उपायुक्त प्रशांत अमृतकर यांच्या मार्गदर्शनाखाली शिरगाव पोलीस आणि गुन्हे शाखेच्या पथकाने ही कामगिरी केली