पिंपरीत हवाई दलाचा टेम्पो उलटून वाहतूक कोंडी; पुणे-मुंबई महामार्गावरील अपघात
By नारायण बडगुजर | Published: April 30, 2024 04:26 PM2024-04-30T16:26:07+5:302024-04-30T16:27:26+5:30
णे-मुंबई महामार्गाववरून हवाई दलाचा टेम्पो मुंबईच्या दिशेने जात होता....
पिंपरी : हवाई दलाचा भरधाव टेम्पो उलटून मोठी वाहतूक कोंडी झाली. मोरवाडी येथे मंगळवारी (दि. ३०) दुपारी दोनच्या सुमारास पुणे-मुंबई महामार्गावर समतल विलगकामध्ये ( ग्रेड सेपरेटर) हा अपघात झाला. दुचाकीस्वाराला वाचविताना टेम्पो उलटल्याचे सांगितले जात आहे.
पिंपरी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक अशोक कडलग यांनी दिलेल्या माहितीनुसार, पुणे-मुंबई महामार्गाववरून हवाई दलाचा टेम्पो मुंबईच्या दिशेने जात होता. ग्रेडसेपरेटरमधून जात असताना मोरवाडीत टेम्पोला एक दुचाकीस्वार आडवा आला. त्याला वाचविताना चालकाचे टेम्पोवरील नियंत्रण सुटले. यात टेम्पो उलटला. टेम्पोतून रस्त्यावर ऑइल गळती झाली.
दरम्यान, याबाबत माहिती मिळताच पोलिस निरीक्षक अशोक कडलग आणि वाहतूक विभागाचे पोलिस घटनास्थळी दाखल झाले. तसेच पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या अग्निशामक दलाचे बंब देखील दाखल झाले. दुपारी तीनच्या सुमारास क्रेनच्या साह्याने टेम्पो हटविण्यात आला. टेम्पोमधून रस्त्यावर ऑइल गळती झाली होती. त्यामुळे अग्निशामक दलाच्या जवानांनी रस्ता पाण्याने स्वच्छ केला.
वाहनांच्या लांब रांगा
ग्रेडसेपरेटरमध्ये रस्त्याच्या मध्यभागी टेम्पो उलटल्याने मोठी वाहतूक कोंडी झाली. खराळवाडीतून चिंचवडच्या दिशेने जाणाऱ्या वाहनांच्या रांगा लागल्या. खराळवाडी येथे ग्रेडसेपरेटरमधील वाहतूक सेवा रस्त्यावर वळविण्यात आली. त्यामुळे खराळवाडीकडून पिंपरी चौकाकडे येणाऱ्या सेवा रस्त्यावर देखील वाहनांची गर्दी होऊन वाहतुकीचा खोळंबा झाला होता.
Pimpri Chinchwad: दुचाकीस्वारास वाचवण्याच्या नादात एअरफोर्सचा ट्रक पलटी, मोरवाडी चौकाजवळील ग्रेड सेपरेटरमधील अपघात
— Lokmat (@lokmat) April 30, 2024
(फोटो- अतुल मारवाडी)#pimprichinchwad#Punepic.twitter.com/eYcWhcoXVl