उद्योगनगरीला वायुप्रदूषणाचा विळखा

By admin | Published: November 9, 2016 02:45 AM2016-11-09T02:45:52+5:302016-11-09T02:45:52+5:30

दिल्लीत धुकेमिश्रित प्रदूषणाची स्थिती निर्माण झाली. त्यानंतर पिंपरी-चिंचवडमध्ये निगडी परिसरात सोमवारी सायंकाळी अचानक धूर व धुकेसदृश परिस्थिती दिसून

Air pollution block in the industrial area | उद्योगनगरीला वायुप्रदूषणाचा विळखा

उद्योगनगरीला वायुप्रदूषणाचा विळखा

Next

भोसरी : दिल्लीत धुकेमिश्रित प्रदूषणाची स्थिती निर्माण झाली. त्यानंतर पिंपरी-चिंचवडमध्ये निगडी परिसरात सोमवारी सायंकाळी अचानक धूर व धुकेसदृश परिस्थिती दिसून आल्याने नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण झाला. नेमका काय प्रकार घडला, याची माहिती घेतली असता, निगडी परिसर हा देहुरोड कॅन्टोन्मेंट बोर्ड आणि पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या सीमेवरील भाग आहे. त्या ठिकाणच्या मोकळ्या जागेत कॅन्टोन्मेट हद्दीतील कचरा टाकला जातो. या कचऱ्याला लावलेल्या आगीमुळे हवेत धुराचे लोट पसरल्याचे दृश्य पहावयास मिळाले. शिवाय औद्योगीक क्षेत्रातील उद्योग व कारखान्यातून बाहेर पडणा-या वायूमुळे प्रदूषणात प्रचंड वाढ झाली असून, नागरी आरोग्यास धोकादायक ठरू लागली आहे.
हवा म्हणजे प्राणवायू... ज्या शिवाय मनुष्याचे जगणे केवळ अशक्यच... पण असा हा प्राणवायूच आरोग्याला धोकादायक ठरत आहे. हवेच्या वाढत्या प्रदूषणामुळे पिंपरी-चिंचवड शहरवासीय सध्या त्रस्त आहेत. दिवसभर धुरकट वातावरणाने नागरिकांमध्ये श्वसनाच्या तक्रारींत वाढ झाली आहे. दिवसेंदिवस वाढत जाणारी वाहने, वर्षानुवर्षापासून रस्त्यावर धावणारी, इंजिन खिळखिळे झालेली नादुरुस्त वाहने, धोकादायक धूर ओकणाऱ्या जुन्या पीएमपीच्या बसगाड्या, जुन्या सहा आसनी रिक्षा, इंधनातील भेसळीमुळे प्राणवायू ठरणाऱ्या शुद्ध हवेला प्रदूषित केले जात आहे. त्यामुळे नागरिकांच्या आरोग्याच्या तक्रारी वाढल्या आहेत.
हवा डोळ्यांनी दिसत नाही, असा वैज्ञानिक सिद्धान्त असला, तरी पिंपरी-चिंचवडवासीयांना प्रदूषणामुळे हवा डोळ्यांना दिसू लागली आहे. त्याचे भीषण रंगही कळू लागले आहेत. ही जीवघेणी ‘किमया’ नैसर्गिक प्राणवायूत मोठ्या प्रमाणात मिसळलेल्या रासायनिक धूलिकण, धूर, व प्रदूषणामुळे झाली आहे. (वार्ताहर)


तातडीच्या उपाययोजनांची गरज
देशभरातील दिल्ली, बिहार, हरियाणा या राज्यांनी वाढत्या प्रदूषणाचा धोका लक्षात घेऊन १५ वर्षांपूर्वीच्या जुन्या वाहनांवर बंदी घातली. पण महाराष्ट्रात प्रामुख्याने मोठ्या शहरांत असा निर्णय घ्यावा. पीयूसीप्रणाली अद्ययावत करून वेळोवेळी वाहनांची तपासणी केली जावी. वाहन कंपन्या व परिवहन विभाग यांनी यातून संयुक्तपणे मार्ग काढावा, जेणेकरून प्रदूषणाचा प्रश्न गंभीर होणे टाळता येईल. जुन्या सहा आसनी रिक्षांवर कडक कारवाई करावी. पीएमपीने खटारा बस बदलाव्यात. पर्यावरणपूरक सीएनजी वाहनांना प्राधान्य द्यावे.


दरदिवशी नवीन वाहनांची भर
शहरात दर दिवसाला दोन ते तीन हजार नव्या वाहनांची भर पडत आहे. शिवाय २५ ते ३० वर्षांपूर्वीची जुनी झालेली वाहनेही रस्त्यावरून सर्रास धावत आहेत. भोसरी ते चाकण, आळंदी, दिघी, विश्रांतवाडी, केएसबी चौक ते कुदळवाडी, चिखली, जाधववाडी, पिंपरी ते काळेवाडी, डांगे चौक ते चिंचवड या मार्गांवर शेकडो जुन्या सहा आसनी रिक्षा दररोज धावतात. डिझेल इंजिन असल्याने आर्थिकदृष्ट्या अशा गाड्या परवडतात, असे रिक्षाचालकांची म्हणणे आहे.

न्यायालयाच्या आदेशाचा विसर
पुणे शहरातील वाढत्या प्रदूषणाबाबत १९८५ मध्ये जनहित याचिका दाखल करण्यात आली होती. या याचिकेच्या सुनावणीत २००२ मध्ये सर्वोच्च न्यायालयाने मार्गदर्शक सूचना केल्या होत्या. उपाययोजना करण्याबाबत महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि पर्यावरणाशी संबंधित शासकीय संस्थांनाही आदेश दिले होते. तेव्हापासून आतापर्यंत करण्यात आलेल्या उपाययोजना तोकड्या ठरल्या आहेत. दरमहा १३ हजार दुचाकी रस्त्यावर येतात. ही पुणे आणि पिंपरी-चिंचवडची स्थिती आहे.

पिंपरी : निगडी येथील भक्ती-शक्ती चौकातील महापालिकेच्या जुन्या जकात नाक्यामागील मोकळ्या मैदानात टाकण्यात येणाऱ्या कचऱ्याला आग लावण्यात येते. त्यामुळे परिसरात मोठ्या प्रमाणात धुराचे लोट पसरत आहेत. धुरामुळे प्रदुषणात वाढ होत असून, नागरिक हैराण झाले आहेत. महापालिका व देहूरोड कॅन्टोन्मेंटच्या सीमारेषेवरील मैदानात कचरा आणून टाकला जातो. हद्दीवरील कचरा दोन्ही प्रशासकीय यंत्रणेकडून उचलला जात नाही.
त्यामुळे अनेक दिवस पडून राहिल्याने कचऱ्याची दुर्गंधी पसरण्यासह त्यास वेळोवेळी आगही लागते. आग लागल्यास त्याचा धूर यमुनानगर, निगडी गावठाण, भक्ती-शक्ती चौक या परिसरात पसरतो. यामुळे या परिसरातील नागरिकांच्या आरोग्य प्रश्न निर्माण झाला आहे. दोन दिवसांपासून दिल्लीत दाट धुके आणि प्रदूषणाचे प्रमाण अचानक वाढले आहे. यामुळे दिल्लीकर हैराण आहेत. अशीच स्थिती शहरात निर्माण झाली आहे का, अशी भीती शहरवासीयांमध्ये निर्माण झाली.

 

Web Title: Air pollution block in the industrial area

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.