पिंपरी-चिंचवड शहरात तपासली जाणार हवेची गुणवत्ता
By ऑनलाइन लोकमत | Published: November 13, 2021 06:00 PM2021-11-13T18:00:42+5:302021-11-13T18:14:37+5:30
डांगे चौक येथील छत्रपती शिवाजीमहाराज पुतळा, भोसरी येथील रोझ गार्डन आणि जगताप डेअरी येथील ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले उद्यान येथे ही यंत्रणा उभारली जाणार आहे
पिंपरी : महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या वतीने शहरात हवेची गुणवत्ता मोजणारी यंत्रणा बसविण्यात येणार आहे. शहरातील थेरगांव, पिंपळे निलख, नेहरूनगर, पिंपरी, भोसरी आदी ठिकाणी ही यंत्रणा बसविण्यात येणार असून, त्यासाठी आवश्यक जागा महापालिकेने प्रदूषण नियंत्रण मंडळाला उपलब्ध करून दिली आहे. पुढील दीड महिन्यात ही यंत्रणा शहरात उभारली जाईल. त्यामुळे हवेची गुणवत्ता मोजण्याबरोबरच शहराचे तापमान आणि हवामान समजू शकणार आहे.
शहरामध्ये पहिल्यांदाच अशी यंत्रणा प्रदूषण नियंत्रण मंडळाद्वारे बसविण्यात येत आहे. यापूर्वी 'आयआयटीएम' या संस्थेकडून शहरात ३ ठिकाणी हवेची गुणवत्ता मोजणारी यंत्रणा बसविलेली आहे. पिंपरी चिंचवड आणि भोसरी येथे यंत्रणा आहे. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून राज्यभरात विविध ठिकाणी हवेची गुणवत्ता मोजणारी यंत्रणा बसविली जात आहे. आता पिंपरी चिंचवड शहरात ही यंत्रणा बसविण्यात येत आहे. त्याबाबतची निविदा मंजूर झाली आहे. प्रत्यक्ष कामही सुरू झाले असून पिंपरीतील आंबेडकर चौकात ही यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली आहे.
डांगे चौक येथील छत्रपती शिवाजीमहाराज पुतळा, भोसरी येथील रोझ गार्डन आणि जगताप डेअरी येथील ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले उद्यान येथे ही यंत्रणा उभारली जाणार आहे. प्रत्येक ठिकाणी यंत्रणा उभारण्यासाठी एक ते सव्वा कोटी रुपये खर्च होणार आहेत.
महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून तापमान, आर्द्रता, सल्फर डायऑक्साइड, नायट्रोजन ऑक्साइड, हवामान आदी मोजणारी यंत्रणा त्यामध्ये असणार आहे. ही यंत्रणा उभारण्यासाठी महापालिकेने जागा उपलब्ध करून दिली आहे.
- संजय कुलकर्णी, कार्यकारी अभियंता, पिंपरी-चिंचवड महापालिका.