अस्तिक, नास्तिक यात माणूसपण जपले पाहिजे : श्रीपाल सबनीस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 21, 2017 04:10 AM2017-08-21T04:10:11+5:302017-08-21T04:10:11+5:30
माणसाने निर्माण केलेल्या देवाची संकल्पना ही माणसाने स्वत:हून लादून घेतलेली संकल्पना आहे. ओझे म्हणून न स्वीकारता हे मानवतेचे भूषण, संस्कृतीचे भूषण म्हणून देव ही संकल्पन स्वीकारली पाहिजे.
पुणे : माणसाने निर्माण केलेल्या देवाची संकल्पना ही माणसाने स्वत:हून लादून घेतलेली संकल्पना आहे. ओझे म्हणून न स्वीकारता हे मानवतेचे भूषण, संस्कृतीचे भूषण म्हणून देव ही संकल्पन स्वीकारली पाहिजे. अस्तिक, नास्तिक यामध्ये माणूसपण जपले पाहिजे, असे मत डॉ. श्रीपाल सबनीस यांनी व्यक्त केले.
विश्वकर्मा पब्लिकेशनच्या वतीने ‘वेदाआधी,’ ‘देवाआधी,’ माणूस होता या विषयावर चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले. या वेळी डॉ. राजेंद्र माने, डॉ. अनिल गांधी, चित्रलेखा पुरंदरे आदी उपस्थित होते.
सबनीस म्हणाले, की अस्तिक, नास्तिक लोक सर्व देशात व काळात मिळतात. वैज्ञानिक युगात नास्तिकांची संख्या कमी आणि अस्तिकांची संख्या जास्त आहे. तसेच विज्ञानाच्या प्रगतीमुळे ही सृष्टी कशी चालते, याची अधिकाधिक माहिती मिळाल्यामुळे त्यासाठी कोणत्या विधात्याची गरज नाही, असे नास्तिक लोक सांगतात. माणसाची प्रकृती हे प्रचंड मोठे कोडे आहे. ज्या वेळेस विज्ञानाची प्रगती नव्हती, अशा कालखंडामध्ये पहिल्या टप्प्यातल्या पूर्वार्धात मानवाच्या वंशांनी त्याच्या पोथीप्रमाणे त्याच्या बुद्धिवादाप्रमाणे शोध लावण्याचा किंवा निसर्गाचे आकलन करण्याचा प्रयत्न केला. या प्रयत्नामध्ये त्यांना देव ही संकल्पना सापडली. आज देव ही संकल्पना आहे म्हणून माणसाच्या वागण्यात माणुसकी आहे.