आकुर्डीत वारकरी भवन, पालखी तळ आरक्षण हवे; वारकऱ्यांच्या शिष्टमंडळाने घेतली आयुक्तांची भेट
By विश्वास मोरे | Published: February 2, 2024 06:19 PM2024-02-02T18:19:58+5:302024-02-02T18:20:22+5:30
पालखी तळासाठी मैदान आरक्षित करावे, कीर्तन महोत्सवाचे आयोजन करावे, अशा मागण्या महाराष्ट्र वारकरी महामंडळाच्या शिष्टमंडळाने केल्या आहेत....
पिंपरी :संत तुकाराम महाराज यांच्या सदेह वैकुंठगमनाला यंदा ३७५ वर्षे पूर्ण होत आहेत. संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याच्या आकुर्डी येथील मुक्कामाला ३०० हून अधिक वर्षे पूर्ण होत आहेत. महापालिकेने आकुर्डीत वारकरी भवन उभारावे. पालखी तळासाठी मैदान आरक्षित करावे, कीर्तन महोत्सवाचे आयोजन करावे, अशा मागण्या महाराष्ट्र वारकरी महामंडळाच्या शिष्टमंडळाने केल्या आहेत.
महाराष्ट्र वारकरी महामंडळाच्या शिष्टमंडळासमेवत आयुक्त शेखर सिंह यांची भेट घेतली. आयुक्तांनी त्यांच्या दालनात बैठक घेऊन या शिष्टमंडळासोबत सविस्तर चर्चा केली. यावेळी भाजप शहराध्यक्ष शंकर जगताप, माजी उपमहापौर शैलजा मोरे, संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याचे प्रमुख माणिक महाराज मोरे इनामदार, संत तुकाराम संस्थान कमिटी अध्यक्ष पुरूषोत्तम मोरे इनामदार, विश्वस्त विशाल महाराज मोरे इनामदार, भंडारा डोंगर समिती अध्यक्ष बाळासाहेब काशीद पाटील, आप्पा बागल, खंडोबा ट्रस्ट निगडीचे अध्यक्ष तानाजी काळभोर. शिवानंद स्वामी, हभप जयवंत देवकर आदी उपस्थित होते.
संत तुकाराम महाराज यांच्या सदेह वैकुंठगमनाला यंदा ३७५ वर्षे पूर्ण होत आहेत. तसेच वारीत पंढरीच्या ओढीने जाणाऱ्या संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याच्या पिंपरी-चिंचडमधील पहिल्या मुक्कामालाही ३०० वर्षाहून अधिक वर्षे पूर्ण होत आहेत, त्यानिमित्ताने वारकऱ्यांनी मागण्या केल्या. वारकरी यांच्या मागण्यांवर आयुक्तांनी सकारात्मक प्रतिसाद दिला.
वारकऱ्यांनी केल्या मागण्या
१) आकुर्डीतील विठ्ठल मंदिरात पालखीचा मुक्काम असतो. आकुर्डी येथे पालखी मुक्कामाच्या ठिकाणी वारकरी भवन उभारावे. वारकऱ्यांसाठी निवासाची व्यवस्था करावी.
२) शहराची वाढती लोकसंख्या आणि भविष्याचा वेध घेऊन वारीची परंपरा अखंड सुरू राहावी, यासाठी पालखी तळासाठी मोठे मैदान आरक्षित करावे.
३) मेट्रोच्या खांबावर संतांचे तैलचित्र, त्यांचे अभंग व वारकरी संप्रदायांशी संबंधित म्युरल्स उभारण्याबाबत कार्यवाही करावी.
४) महापालिकेच्या वर्धापनदिनानिमित्त दरवर्षी किर्तन महोत्सवाचे आयोजन करावे.