Indrayani Polluted: बापरे केवढं हे प्रदूषण! इंद्रायणी पुन्हा एकदा फेसाळली, चक्क बर्फवृष्टी झाल्याचा भास
By विश्वास मोरे | Published: May 29, 2024 11:15 AM2024-05-29T11:15:53+5:302024-05-29T11:16:21+5:30
लोणावळ्यातील उगमापासून तर तुळापूर येथील संगमापर्यंत शंभर किलोमीटरच्या परिसरामध्ये नदीपात्र दूषित
पिंपरी: अवघ्या महाराष्ट्रातील वारकरी संप्रदायाचे महत्त्वाचे तीर्थक्षेत्र असणाऱ्या देहू- आळंदीकरांची जीवनदायी असणाऱ्या इंद्रायणीनदीचे पात्र फेसाळली आहे. त्यामुळे बर्फवृष्टी झाल्याचा भास होता होत आहे. नदीप्रदूषणाकडे जिल्हा प्रशासन, एमआयडीसी आणि पीएमआरडीचे दुर्लक्ष होते.
पुणे जिल्हयातील खेड आणि मावळ तालुक्यातून इंद्रायणी नदी वाहते. लोणावळ्यातील उगमापासून तर तुळापूर येथील संगमापर्यंत शंभर किलोमीटरच्या परिसरामध्ये नदीचे पात्र दूषित झाला आहे. नदीच्या दोन्ही बाजूंना मोठ्या प्रमाणावर औद्योगिकीकरण, नागरिकरण वाढले आहे. त्यामुळे नदी प्रदूषणात दिवसेंदिवस वाढ होत आहे. याकडे राज्य सरकारचे, प्रदूषण नियंत्रण मंडळाचे दुर्लक्ष होते.
सहा महिने झाले तरी...
गेल्या सहा महिन्यांपासून सातत्याने इंद्रायणी नदी फेसाळत आहे. मात्र नदी फेसाळण्याचं कारण अजूनही प्रदूषण नियंत्रण मंडळाला सापडलेले नाही. डिटर्जंटमुळे नदी फेसाळत आहे, असा अजब अंदाज प्रदूषण नियंत्रण महामंडळ लावत आहे.
चाकण परिसरातील सांडपाणी थेटपणे!
पीएमआरडीच्या हद्दीत मोठ्या प्रमाणावर औद्योगीकरण झालं आहे. तसेच चाकण परिसरातील निघोजे, मोई आणि चिंबळी या भागातील सांडपाणी थेटपणे नदीत सोडले जात आहे. त्याकडे पीएमआरडीएचे लक्ष नाही.
कालपासून पुन्हा नदी फेसाळली
इंद्रायणी नदीवर देहू आणि आळंदी ही प्रमुख तीर्थक्षेत्र येतात. आळंदी पाण्याची गुणवत्ता ढासळलेली आहे. कालपासून नदी फेसाळलेली आहे. बुधवारी सकाळी ही नदीची अवस्था वाईट असल्याचे दिसून आले. सर्वत्र बर्फवृष्टी झाल्याचा भास होतो होता.
सामाजिक आणि पर्यावरणवादी संघटनांनी केल्या तक्रारी!
आळंदीतील नदी प्रदूषणाबाबत जलदिंडी प्रतिष्ठान, इंद्रायणी सेवा संघ आदी संस्थांच्या वतीने प्रदूषण नियंत्रण मंडळाकडे तक्रारी केलेल्या आहेत. नदी प्रदूषण रोखावे, तातडीने उपाय योजना कराव्यात, अशी मागणी केली आहे.