आळंदीला देणार २ लाख लिटर पाणी
By admin | Published: May 11, 2017 04:43 AM2017-05-11T04:43:53+5:302017-05-11T04:43:53+5:30
महापालिकेच्या माध्यमातून तीर्थक्षेत्र आळंदीला दररोज दोन लाख लिटर पाणी पुरवठा करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय महापालिका
लोकमत न्यूज नेटवर्क
पिंपरी : महापालिकेच्या माध्यमातून तीर्थक्षेत्र आळंदीला दररोज दोन लाख लिटर पाणी पुरवठा करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी घेतला आहे.
संत ज्ञानेश्वरमहाराज आणि संत तुकाराममहाराज पालखी सोहळा काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. गेल्या काही दिवसांपासून आळंदीकरांना दूषित पाणीपुरवठा केला जातो. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांमध्ये संतापाची लाट आहे. मात्र, पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या माध्यमातून आळंदीसाठी पिण्यासाठी पाणीपुरवठा करावा, यासाठी आमदार महेश लांडगे यांनी आयुक्त श्रावण हार्डीकर यांच्या उपस्थितीत बैठक घेतली होती. आळंदी आणि परिसरात सध्या पिण्याच्या पाण्याचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. इंद्रायणी नदीच्या प्रदूषणामुळे आळंदीकरांना नाहक मनस्ताप सहन करावा लागत आहे. वास्तविक पिंपरी-चिंचवडमधील औद्योगिक वसाहती आणि महापालिका प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे इंद्रायणीच्या प्रदूषणात वाढ झाली. तेच पाणी पुढे आळंदीत बांधलेल्या बंधाऱ्यामध्ये जाते. या पाण्यावर प्रक्रिया करून नगर परिषद आळंदीकरांना पुरवठा करीत आहे. मात्र, पाणी प्रक्रिया प्रकल्प सदोष असल्यामुळे नागरी आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. याबाबत पिंपरी-चिंचवड महापालिका प्रशासनाने तोडगा काढावा, अशी आग्रही मागणी केली होती. त्याला महापालिका आयुक्तांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. तसेच पाणीपुरवठा विभागाला दररोज दोन लाख लिटर पाणी आळंदीला द्यावे अशा सूचना दिल्या आहेत.